ऑनलाईन टीम / पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित ‘अन्वेषण संशोधन स्पर्धा २०१९-२०’ मध्ये विभागीय तसेच भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली आणि राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहे. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या वर्धापनदिनी १० फेब्रुवारी २०२१ रोजी कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सर्व विद्याशाखेमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त अनुराग रामराव लंबोर व गौरव संतोष दुधे यांच्या संशोधन प्रकल्पाला सुवर्णपदक आणि ७५ हजार रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्याने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामध्ये दोन्ही स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर अनिकेत केतन पानवलकर व आशुतोष आनंद महामुनी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे तर विभागीय स्तरावर या दोघांनाच व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. क्षितीज महेश कुलकर्णी यांस विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कुलसचिव आणि अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्षाचे माजी संचालक डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यमान संचालिका डॉ. सुप्रिया पाटील, उपकुलसचिव मुंजाजी रासवे, अविष्कार स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मोहन वाघ व इतर सदस्य डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. प्रशांत साठे, डॉ, वैभव जाधव, समन्वयक डॉ. मनीष वर्मा त्याचप्रमाणे संतोष खरात, सोनाली पवार, संघ व्यवस्थापक या सर्वांनी सहभागी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.