सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात बुधवारी दि. ०९ जून २०२१ रोजी दुपारी चार वाजता ऑनलाईन पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व पालक संघाच्या समन्वयक प्रा.सुरेखा शिंदे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे या पालक मेळाव्यास मार्गदर्शन करणार असून कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन परीक्षा पद्धती, विद्यार्थी व पालकांच्या समस्या, महाविद्यालयाची भूमिका, विद्यार्थी विकासासाठी महाविद्यालयाने आरंभलेले उपक्रम अशा विविध विषयांवर पालक मेळाव्यात विचारमंथन होणार असून महाविद्यालय व पालकांमध्ये समन्वय राहण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
महाविद्यालयातील कला, वाणिज्य, बी.सी.ए., नर्सिंग अशा सर्वच शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुनिता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर व नॅक समन्वयक डॉ. जयश्री आफळे यांनी केले आहे.