प्रतिनिधी/ खेड
पतीसह सासूच्या मानसिक छळाला कंटाळून 30 वर्षीय विवाहिता चार वर्षीच्या मुलासह आत्महत्येच्या उद्देशाने रेल्वे ट्रकवरच झोपली. मत्स्यगंधा एक्स्प्रेस स्थानकात दाखल होण्याच्या काही वेळ आधी अचानक हा प्रकार घडला. मात्र स्थानकावरील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तत्काळ या दोघांना रेल्वेमार्गावरून दूर करत त्यांचे प्राण वाचवले. गुरूवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली.
दापोली तालुक्यातील फरारे येथील ही विवाहिता आपल्या चिमुकल्यासह खेड रेल्वेस्थानकात आली होती. सायंकाळच्या सुमारास मडगावच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस स्थानकात दाखल होण्याच्या काहीवेळेपूर्वी ही विवाहिता लेकरासह थेट रेल्वे ट्रकवरच जीव देण्यासाठी झोपली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच तातडीने धाव घेत दोघांनाही ट्रकवरून बाजूला केले. यानंतर रेल्वे कर्मचाऱयांशी संपर्क साधून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पती व सासू मानसिक छळ करत असल्यामुळेच आपण आत्महत्या करणार होतो, असे या विवाहितेने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.