मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून कृत्य – दोघे जखमी -सासऱयावर गुन्हा
प्रतिनिधी/ वाई
येथील वाकेश्वर नजीक दीप गॅरेज परिसरात सासऱयाने जावयाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने जावयासह दोघे जखमी झाल्याची घटना दि. 28 रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. प्रेम विवाह केल्याच्या रागातून हा प्रकार करणाऱया सासऱयावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आदित्य ठोंबरे यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदित्य दिनकर ठोंबरे(वय 27 रा. वाकेश्वर फाटा बावधन) याने दिलेल्या फिर्यादीवरून तो भारतीय सैन्य दलात आहे. तो सध्या सिक्कीम येथे सेवेत आहे. सुट्टीनिमित्ताने तो गावात आला असून दि.7 मे 2021 रोजी त्याने त्याच्या घरासमोर राहणाऱया सालविका संदीप पिसाळ हिच्यासोबत प्रेम विवाह केला होता. त्यामुळे या घटनेवरुन वाद वाढलेला होता.
त्याचाच राग मनात धरून संदीप मदन पिसाळ (रा. वाकेश्वर फाटा बावधन) याने आदित्य ठोंबरे हा त्याच्या चुलत भाऊ नितीन यांच्यासोबत दुचाकीवरून दि. 28 रोजी सायंकाळी 6.30 वाजता वाई येथे निघाला होता त्यावेळी त्याच्या चार चाकी गाडीतून जोरात शिव्या देत पाठीमागून धडक दिली. घटनेनंतर तो तेथून निघून गेला. या धडकेत आदित्य आणि नितीन हे दोघे जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाई पोलिसांनी संदीप पिसाळ याला अद्याप अटक केली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.