कळंगूट येथे भाऊसाहेब बांदोडकर जयंती कार्यक्रम
प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यात काँग्रेस सरकारच येणार होते मात्र काँग्रेस तिसवाडी, बार्देशपेक्षा दक्षिणेत विशेषतः सासष्टीत कमी पडल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी हुकली. कळंगुटच्या मतदारांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवित पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी केलेले आहे. त्यामुळे त्या विश्वासाला पात्र राहून एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहाणार असून कळंगुटबरोबरच राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील समस्यांवर आवाज उठविणार असल्याची ग्वाही कळंगुटचे नवनियुक्त आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटात दिली.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात लोबो बोलत होते. यावेळी कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, उपसरपंच शेरॉल लोबो, स्थानिक श्री बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर, पंचायत मंडळाचे इतर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
तरुणांना पक्षात सामावून घेणार
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारण्याचे कारण विचारले असता लोबो यांनी आपण काँग्रेस पक्षात नवीन असल्याने यावर पक्षाच्या वरिष्ठांनी अधिक भाष्य करणेच योग्य ठरणार, असे सांगितले. काँग्रेसने यापुढे तरुण रक्ताला राजकीय क्षेत्रात सामावून घेणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आपण जादुगर नाही
शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी आपल्याला जादुगर असे संबोधल्याचा उल्लेख करताना माजी मंत्री मायकल लोबो यांनी आपण जादुगर नसून सामान्य माणसाच्या भावना जाणून घेणारा राजकारणी असल्याचे सांगितले. तुम्ही जेव्हा सामान्य माणसाच्या हाकेला ओ देतात तेव्हा सामान्य माणूस तुम्हाला आपल्या हृदयात जागा देत असतो म्हणूनच सामान्य माणसाच्या व्यथा वेदना ऐकून घेत त्यांना वाट करून देण्याची तळमळ प्रत्येक राजकारण्यामध्ये असली पाहिजे. तरच प्रत्येक राजकारणी समाजमनावर जादुमय कामगिरी करू शकतो. असे म्हणत लोबो यांनी मांद्रेकर यांची फिरकी घेतली.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे अशाच लोकांपैकी अग्रस्थानी असलेले विशेष असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यामुळेच गोव्यातील गरीब जनतेला मुंडकार कायद्याद्वारे राहत्या घराचा हक्क आणि ‘कसेल त्याची जमीन’ कायद्याद्वारे शेतजमिनीचा मालकी वाटा प्राप्त झाल्याचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक तसेच भाऊसाहेब बांदोडकर ट्रस्टचे डायस, प्रतिभा नार्वेकर, सरपंच शॉन मार्टीन्स तसेच चंद्रकांत चोडणकर यांची भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर यांनी केले. पोलीस निरीक्षक लक्ष्मी आमोणकर यांनी पोलीस फौजफाटा घालून येथील परिसर स्वच्छ करून घेतला.