प्रतिनिधी / मडगाव
दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात कोरोना सकारात्मक रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सासष्टीतील अंाबेली, नावेली, कुडतरी व राय या भागात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सरकारने जारी केलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. सासष्टीत आत्ता पर्यंत एकूण 52 रूग्ण आढळून आले आहेत.
कुडतरी मतदारसंघातील कुडतरी पंचायत क्षेत्रात एकूण 21 जण तर राय पंचायत क्षेत्रात 7 जण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. कुडतरी येथील एक पिकअप ड्राईव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्यानंतर या ड्रायव्हरचे नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून होते. आत्ता कुडतरीचे नागरिक स्वताहून कोरोना चाचणीसाठी पुढे येत असून कुडतरी आरोग्य केंद्रात त्याचे स्वॅब घेतले जाते.
मडगाव पालिका क्षेत्रात आत्ता पर्यंत दहा जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्यात कोविड इस्पितळातील कर्मचारी तसेच चिखली आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयाचा समावेश आहे. आंबेली पंचायत क्षेत्रात आत्ता पर्यंत 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आंबेली व कुडतरी येथील दोन धर्मगुरूना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल सरकारने जारी केलेल्या अधिकृत माहिती प्रमाणे, नावेली पंचायत क्षेत्रातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सासष्टीत कोरोनाच्या केसेस वाढू लागल्याने डॉक्टरांना कोरोनाव्हायरसचा सामुदायिक प्रसार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. दोन धर्मगुरूना संसर्ग झाल्याने, याला पुष्टी मिळत असल्याचे डॉक्टराचे मत आहे. राय येथील एक व्यक्ती सद्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून या व्यक्तीने प्रार्थनेला उपस्थिती लावली होती. त्यातूनच हा संसर्ग झाला अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.