वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहर व परिसराने नेहमीच मराठी वारसा जोपासला आहे. याचाच भाग म्हणून निपाणीत दरवर्षी मराठी साहित्य संमेलन होत असते. यंदाही या संमेलनाची तयारी पूर्णत्वाला आली असताना कर्नाटक प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हेच संमेलन 18 व 19 रोजी अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय सभागृहात घेण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन देताच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांनी कोणतीही अट न घालता संमेलन भरविण्यासाठी परवानगी दिली.
मंगळवारी निपाणी मराठी साहित्य संमेलन रसिक मंडळातर्फे प्रा. शरद कांबळे, अजय माने व जयराम मिरजकर यांनी कोल्हापूर येथे जात शिवसेना नेते विजय देवणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. या अधिकाऱयांनी मुरगूड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून रितसर परवानगीचे पत्र दिले.
या परवानगीमुळे 18 व 19 रोजी होणारे साहित्य संमेलन देवचंद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. यानुसार संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने, रसिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सहकारी परिश्रम घेत आहेत.
ग्रंथदिंडीही ‘देवचंद’मध्येच
कर्नाटक शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांनी निपाणीत राजा शिवछत्रपती सांस्कृतिक कार्यालयात होणाऱया नियोजित मराठी साहित्य संमेलनाला परवानगी नाकारली. यानुसार प्रशासकीय सुचनेचा आदर करत साहित्य रसिक मंडळाने देवचंद महाविद्यालयात संमेलन घेण्याचा निर्धार व्यक्त केला. पण त्याचबरोबर ग्रंथदिंडी तरी निपाणीतून काढण्याची परवानगी आहे की नाही, असे विचारले. यावेळी पोलीस अधिकाऱयांनी ही परवानगीही नाकारल्याने ग्रंथदिंडीही देवचंद महाविद्यालयातच होईल, असे सांगितले आहे.