देह विक्री करणाऱ्या महिला पंधरा हजार रूपये मदतीच्या प्रतीक्षेत
सुधाकर काशीद / कोल्हापूर
साहेब पंधरा हजार रुपये एक रकमी आणि तेही आमच्या बँकेच्या पुस्तकावर! अजून खरं वाटत नाही पण पैसे जमा झालं तर मात्र भारीच होणार …. कमल. ठाकरे साहेबांनी पैसे मंजूर केल्यात असं मावशीने सांगितलं. पण हे पैसे रोज रस्त्यावर उभा राहून गिऱ्हाईक शोधणाऱ्या बाईच्याच हातात पडायला पाहिजेत….. सुनंदा. पैसे जमा होतील तेव्हा खरं. बायकांची यादी कशी झाली या त्यावरही लक्ष ठेवायला पाहिजे. नाहीतर पंधरा हजार रुपये मिळणार म्हटल्यावर आम्ही बाजूला आणि नको तीच नाव त्यात असायची……. लता
अशा वेगवेगळ्या शब्दातून भावना व्यक्त करणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत कोल्हापुरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या. कोरोना संसर्गाच्या काळात या महिलांच्या वाट्याला केवळ एकांतवास आला. रात्री रस्त्यावर उभं राहण्याची सोय नाही. उभारले तर कोरोनाच्या भीतीने गिऱ्हाईक नाही. त्यामुळे रुपया नव्हे तर एक पैशाचीही कमाई नाही. त्यातही देहविक्री करणाऱ्या बाईला कुठे भांडी धुण्याचे झाडू मारण्याचे काम द्यायलाही कोण तयार नाही. त्यामुळे या महिला गेल्या सात-आठ महिन्यात अगदी गोठून गेल्या. या परिस्थितीत शासनाने अशा महिलांच्यासाठी तीन महिन्यासाठी पंधरा हजार रुपये व शाळेला जाणारे मुल असलेल्या महिलेला आणखी अडीच हजार रुपये इतकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केली. या निधीतून कोल्हापूर जिह्यातील देहविक्री करणाऱ्या साधारण 535 महिलांसाठी मिळून 76 लाख रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. त्यामुळे या महिलांत आपल्याला किमान 15 हजार रुपये एकरकमी मिळणार ही एक अशी आशेची भावना निर्माण झाली आहे. पण खरोखर ज्या देहविक्री करूनच आपली रोजीरोटी चालवतात त्यांच्याच हातात ही रक्कम पडावी असा या महिलांचा एकूण सूर आहे.
कोल्हापुरात स्टेशन रोड, एसटी स्टँड, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, अयोध्या टॉकीज, कोंबडी बाजार या परिसरात देहविक्रय करणाऱया महिलांचा वावर असतो. त्या दिवसाही असतात. रात्री मात्र त्यांची संख्या जास्त असते. कारण रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याने बंद दुकानांच्या कट्ट्यावर बसायची त्यांची सोय होते. ऊन, वारा, पाऊस, थंडीत त्या थांबलेल्या असतात अशाळभूत नजरेने गिऱ्हाईक शोधत असतात. अतिशय वाईट गोष्ट अशी की घरी एकटे लहान मुलं ठेवायची सोय नसल्याने काहीजणी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन तिथे उभ्या राहतात.
अशा महिलांसाठी शासनाने काहीतरी केले पाहिजे. असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेच सहा-सात वर्षांपूर्वी दिले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या महिलांच्या वाट्याला संसर्गाची भीती आणि उपाशीपोटी रहाण्याची वेळ आली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महिलांच्या परिस्थितीची दखल घेऊन राज्यभरातील अशा यादीवरील महिलांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला 76 लाख 20 हजार रुपये आले आहेत आता ते पैसे प्रत्यक्षात देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हातात पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
देहविक्रय करणाऱ्या महिलांची यादी जिल्हा एड्स नियंत्रण कमिटीकडून आम्हाला आली आहे. या यादीतील महिलांकडून ही अंडरटेकिंग घेतले जाणार आहे. त्यांचे आधार कार्ड बँक पासबुक याची छाननी केली जाणार आहे व ही रक्कम या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे
सुजाता शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
रस्त्यावर उभे राहून देहविक्रय करणाऱ्या या महिलांच्यात कोल्हापूर पोलिसांच्या बद्दल खूप खूप चांगली भावना आहे. अशा पद्धतीने आम्ही रस्त्यावर उभा राहणे हा गुन्हा आहे. पण तरीही मानवतेच्या भावनेतून पोलीस फार कडक वागत नाहीत हे आमच्यासाठी खूपच चांगले असल्याची भावना सर्वच महिलांच्या बोलण्यात आहे.