कराडात विनाकारण फिरणारांना सापडले नवे कारण
प्रतिनिधी/ कराड
कराड, मलकापूर शहरातील रस्त्यांवर वाहनधारकांची वर्दळ पुन्हा वाढली असून चेकपोस्टवर पोलिसांना सर्रास खोटे सांगून विनाकारण पै पाहुण्याकडे, मित्रांकडे जाणारे निसटत आहेत. कोरोनाचे सध्या लसीकरण सुरू असून पोलिसांनी अडवेलच तर साहेब लस घ्यायला निघालोय हे नवे कारण विनाकारण फिरणारांना मिळाले आहे.
सोमवारपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. कराड तालुक्यात आत्तापर्यंत तब्बल 18 हजार 190 रूग्णसंख्या झाली असून रूग्णवाढीचा वेग पाहता चार दिवसात हा आकडा 20 हजारांच्यापुढे जाण्याची भिती आहे. लाखो नागरिक घरी बसून नियमांचे पालन करत असताना काही नागरिकांच्यातील बिनधास्तपणा प्रचंड वाढला आहे. सर्वकाही बंद असताना अनेक युवक,युवती, नागरिक बिनधास्तपणे वाहने घेऊन सुसाट सुटत आहेत. आत्तापर्यंत वेगवेगळी कारणे सांगत प्रशासनाची दिशाभूल करणारांना आता नवे कारण मिळाले आहे. साहेब लस घ्यायला निघालोय…हे कारण सांगून आता रस्त्यावरील गर्दी पुन्हा वाढली आहे. कराड शहरात जाण्यासाठी ठराविक दोनच रस्ते मोकळे ठेवले आहेत. या रस्त्यांवर त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. पोलीस प्रशासनाने आणखी कडक भुमिका घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा कराड तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक रोखणे अवघड होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.