सिंगापूर
जगातील अनेक देशांना संकटात टाकणाऱया कोरोनाशी लढण्यासाठी विविध देशांनी तयारी केली असून सिंगापूरनेही आता फायझरच्या पॅक्सलोविड गोळीला मंजुरी दिली असल्याचे समजते. ज्या व्यक्तींना कोरोना गंभीर करू शकतो अशा लोकांनाच ही गोळी दिली जाणार असल्याचे सिंगापूरमधील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. अधिकाऱयांच्या मते पॅक्सलोविडसंदर्भातील प्रयोगशाळेतील यशस्वी परीक्षणाच्या आधारावरील माहितीच्या उपलब्धतेनुसार या गोळीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लक्षणे समजल्यानंतर तीन दिवसात सदरची गोळी रुग्णाला दिल्यास त्याचे गंभीर होणे, त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये भरतीचे प्रमाण 88 टक्क्यानी घटते, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे. द स्ट्रेट टाइम्स यांच्या म्हणण्यानुसार लक्षणे समजल्यानंतर पाच दिवसाच्या आत पॅक्सकोविड गोळी रुग्णाला दिली गेली तर ती 87 टक्के प्रभावी ठरू शकते, असाही दावा केला जात आहे.