सिंगापूर : सिंगापूर देशात मंगळवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत 399 ने वाढ झाली आहे. मात्र यातील बहुसंख्य नवे रूग्ण विदेशी वंशाचे नागरीक आहेत. या नागरीकांना स्वतंत्र वस्तीस्थानांमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथेच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत या छोटय़ा देशात 48 हजार 434 नागरीकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र एकंदर मृत्यूंची संख्या 27 आहे. आरोग्य सेवेची उपलब्धता मोठय़ा प्रमाणावर असल्याने मृतांची संख्या अत्यल्प आहे. या देशातील लॉकडाऊन आता पूर्णपणे हटविण्यात आला असून आर्थिक व्यवहार खुले करण्यात आले आहेत.
फ्रान्समध्ये जबर दंड
पॅरीस : सार्वजनिक स्थानी मास्क न उपयोगात आणणाऱयांना फ्रान्स सरकारने जबर दंड ठोठावण्याची योजना घोषित केली आहे. त्यानुसार अशा बेजबाबदार व्यक्तींकडून 155 डॉलर्स दंड संकलित केला जाईल. राजघानी पॅरीसच्या काही भागांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून पुन्हा मास्क अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. काही मोकाट लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱयांनाही संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे फ्रान्स सरकारकडून अशा बेजबाबदार नागरीकांविरोधात कायद्याचे कठोर क्रियान्वयन करण्याचा आदेश देशभरातील पोलिसांना देण्यात आला आहे.