देशभरात खळबळ; दोघांची शरणागती, सात दिवसांसाठी कोठडीत रवानगी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीनजिकच्या सिंघू सीमेवर पोलीस बॅरिकेड्सला एका 35 वषीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह बांधलेला आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य तंबूच्या जवळील बॅरिकेड्सला बांधला होता. संबंधित व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार केलेले दिसत होते. दरम्यान, याप्रकरणी दोघांनी शरणागती पत्करली आहे. त्यानंतर संशयित निहंगा सरबजीत सिंग आणि निहंगा नारायण सिंग यांना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सोनिपतमधील कुंडली येथे पहाटे 5 वाजता बॅरिकेड्सला हात बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेड्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हाती घेण्यात आला. कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळावर दाखल होत मृतदेह खाली घेतला. तसेच हा मृतदेह विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना केला होता.
दरम्यान, या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. आम्हाला निहंगा सुरुवातीपासून अडचणीत आणत असल्याचे सांगत संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे.