पंजाबच्या फतेहगढ साहिबचा होता रहिवासी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणामध्ये सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान आणखीन एका शेतकऱयाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शेतकऱयाचा मृतदेह सीमेवरील एका झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. मृत शेतकरी पंजाबमधील फतेहगढ साहिब जिल्हय़ाचा रहिवासी होता आणि तो दीर्घकाळापासून आंदोलनात सामील होता. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
45 वर्षीय गुरप्रीत सिंह मागील काही काळापासून सिंघू सीमेवर स्वतःच्या सहकाऱयांसोबत ट्रॉलीत वास्तव्यास होता. दिवाळीपूर्वी त्याचे सहकारी घरी परतले होते. त्यानंतर तो ट्रॉलीमध्ये एकटाच राहत होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत असल्याचे आंदोलनात सामील अन्य शेतकऱयांना दिसून आले. याप्रकरणी परिसरातील अन्य ट्रॉलींवर राहणाऱया शेतकऱयांकडून माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. पोलिसांनी मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. शेतकऱयाची हत्या करण्यात आली का त्याने आत्महत्या केली हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.