मूळ पडवे येथील गौरीने सारेगमप स्पर्धेत रचला इतिहास
वार्ताहर / कुडाळ:
झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱया शोची महाविजेती ठरली आहे, सिंधुकन्या आणि लिटिल चॅम्पच्या मंचावरील ‘सुरांची डॉन’ व ‘जासूस’ गौरी भूषण गोसावी. बारा वर्षांपूर्वी रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेली कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे ही पंचरत्ने यावेळी परीक्षकांच्या भूमिकेत होती. त्यांनी या नव्या लिटिल चॅम्परुपी हिऱयांना पैलू पाडून त्यांच्या जीवनाचे सोने केले. त्यातूनच अतिशय ‘टफ कॉम्पिटिशन’ असूनही मूळ पडवे (ता. कुडाळ) या गावची रहिवासी असलेल्या गौरी गोसावीने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या ‘व्हर्सस्टाईल’ गायकीने वेगळी छाप सोडत महाविजेतेपदावर आपली मोहोर उमटविली. अँकर मृण्मयी देशपांडे व सारेगमपचा संपूर्ण वाद्यवृंद तसेच कार्यक्रमात विशेष अतिथी जज म्हणून येणाऱया दिग्गजांचेही तिला मार्गदर्शन लाभले.
मूळ पडवे (ता. कुडाळ) येथील रहिवासी असलेले गोसावी कुटुंब सध्या मुंबई येथे स्थायिक झाले आहे. गौरीला सुरेलपणाचा वारसा तिचे पणजोबा कै. तुकाराम रघुनाथ गोसावी, निवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, भजनाची आवड असणारे आजोबा, नामधारक कै. सुरेश तुकाराम गोसावी तसेच तिचे वडील, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त व उपसचिव भूषण सुरेश गोसावी यांच्याकडून मिळाला आहे.
गोड गळय़ाचे, सुरेल पण प्रसिद्धीपासून दूर राहणारे गायक म्हणजे गौरीचे वडील भूषण गोसावी. ते BMC मध्ये अभियंता आहेत. तिची आई भक्ती गोसावी या मुंबई-अंधेरी येथील विद्या विकास हायस्कूलची शिक्षिका आहे. घरात आध्यात्मिक संस्कार असून कुटुंब अध्यात्माद्वारे मार्गक्रमण करत आहे.
गौरीच्या गाण्याची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षी जीवन विद्या मिशनच्या कार्यक्रमातून झाली. तिचे आद्य गुरू आजी स्मिता व वडील भूषण हे होय. त्यानंतर ती गुरू, संगीतकार दीपक पाटेकर व सागर मेस्त्राr यांच्याकडे संगीताचे धडे घेत आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांच्या ‘गाणे गा रे पावसा’ या अल्बमसाठी तिने पहिले गाणे गायिले.
दरवषी सुट्टीत मे महिन्यात तिला आपल्या पडवे या गावी यायला आवडते. कोकणातले समुद्रकिनारे, आंबे, मासे विशेषतः कोळंबी तिला भरपूर आवडतात. गाणी ऐकणे हा तिचा आवडता छंद आहे. गायनाबरोबरच अभ्यासातही तिचे सातत्य आहे. बोरिवलीच्या सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती आठवीत शिकत आहे. शाळेत ती नेहमीच ‘टॉपर’ राहिली असून वर्गात नेहमी 95 टक्के गुण मिळवित आली आहे. सारेगमपच्या सेटवरूनही अभ्यास करून तिने परीक्षा दिली आहे. सायन्सची प्रोफेसर होऊन तिला पार्श्वगायनात करियर करायचे आहे. पाट हायस्कूलच्या शिक्षिका सौ. यज्ञा गोसावी-साळगावकर यांची ती नात होय.