स्टाफही कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने वाटते भीती! : कर्तव्य श्रेष्ठ समजून रुग्णसेवेत व्यस्त!
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
मुंबई हा कोरोनाचा हॉट स्पॉट आहे. आज मुंबईतील मुख्य रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून तयार केली गेली आहेत. यात सर्वत्र रात्रंदिवस सेवा बजावत आहेत, ते आरोग्य कर्मचारी. मुंबईतील लीलावती हॉस्पिटल हे नामांकित हॉस्पिटल. आता तेही कोरोना रुग्णांनी भरले आहे. अशावेळी लीलावतीमध्ये सिंधुकन्या जीचे सासर देवगड व माहेर आचरा येथे असून श्रावणी सुनील घारकर या कोरोना योद्धा म्हणून प्राणाची बाजी लावून लढत आहेत. कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेसाठी दिवस-रात्र सज्ज असलेली ही रणरागिणी कोरोना योद्धा श्रावणी घारकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रावणी या प्रभाकर घाडी यांच्या कन्या असून प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण आचरा येथे केल्यानंतर चिपळूण येथील डेरवण नर्सिंग कॉलेजमध्ये तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर श्रावणी यांनी मुंबई गाठली. अल्पावधीतच मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या नोकरीला लागल्या. लीलावतीमध्ये त्या स्टाफ इन्चार्ज म्हणून सेवा बजावत आहेत. आज श्रावणी लीलावतीमध्ये बारा तास कोरोना रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. यात रुग्णांच्या मानसिकतेला धक्का न देता, त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याचे महत्वाचे कामही श्रावणी करत आहे. हे सर्व करत असताना आज त्या कधीही सुट्टी घेत नाही किंवा आपले काम पूर्ण झाले म्हणून घरीही लवकर जात नाहीत. कोरोना रुग्णांची सेवा करून ते लवकर कसे बरे होतील हेच त्यांचे ध्येय आहे.
श्रावणी म्हणाल्या, कोरोना रुग्णांची संख्याही मुंबईत मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. लीलावतीमध्येही कोरोनाचे मोठय़ा संख्येने रुग्ण आहेत. परंतु, या सर्वांवर योग्य पद्धतीने उपचार झाले, तर कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होऊन घरी जात आहेत. रुग्णांची सेवा करताना आमचे स्टाफही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. अशावेळी मनात थोडीशी भीती वाटते. परंतु, रुग्णसेवा हेच आमचे सर्व काही असल्यामुळे याही परिस्थितीत मी आणि माझे पती सुनील आम्ही दोघेही या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहोत. त्या आपल्या छोटी मुलीला सांभाळण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत. यासाठी तिला नेहमी कसरत करावी लागत आहे. नालासोपारा ते बांद्रा हे सुमारे दोन तासांचे अंतर पार करून त्या कोरोनाशी सामना करत आहेत. समाजासाठी असलेल्या श्रावणी यांची ही भावना आणि कर्तव्य तत्परता व जिद्द कौतुकाचा विषय ठरत आहे. प्रसंगी पदरमोड करून रुग्णांसाठी त्या अहोरात्र झटत आहेत. त्यांनी अनेक कुटुंबांना मदतही केली आहे. कोरोना योद्धा म्हणून सिंधुकन्या श्रावणी यांच्या या कार्याला सलाम.