बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित : अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन बँकेचा पुरस्कार
62 देशांमध्ये कार्यरत 2.80 लाख कर्मचाऱयांतून निवड : सुषमा कुडाळच्या सुकन्या, मराठी शाळेत शिक्षण : पुरस्कार ‘कोव्हिड’शी लढणाऱया भारतीयांना अर्पण
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जगभरातील 62 देशांमध्ये विस्तार आणि तब्बल 2 लाख 80 हजार कर्मचारी असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा जे. पी. मॉर्गन चेस या अमेरिकन बँकेच्या जगभरातील कर्मचाऱयांमधून सिंधुदुर्गची सुकन्या सुषमा ठाकूर-पाटणकर यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. जे. पी. मॉर्गनचे सिनियर प्रेसिडेंट मिचेल रॉसन यांच्या हस्ते सुषमा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘5 Keys’ अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणाऱया सुषमा हय़ा पहिल्या भारतीय, पहिल्या आशियन व दुसऱया बिगर अमेरिकन कर्मचारी ठरल्या आहेत.
सिंधुदुर्गातील कुडाळ गावच्या सुकन्या असलेल्या सुषमा ठाकूर-पाटणकर ह्या अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन बँकेत ‘रिजनल ग्रिव्हीयन्स मॅनेजर’ या अत्यंत महत्वाच्या वरिष्ठ पदावर काम करीत आहेत. या बँकेकडून 500 ते 1000 कोटी पर्यंतचे कर्ज उचलणाऱया बँकेच्या ग्राहकांबरोबर डिलिंग करणे, बँकेबाबत त्यांच्या असलेल्या तक्रारी दूर करणे, बँकेसोबतचे त्यांचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणे आदी महत्वपूर्ण जबाबदारी बँकेने त्यांच्यावर सोपवली आहे. अमेरिकेतील ऍरिझोना राज्यात त्यांचे कार्यालय आहे.
तब्बल 62 देशांमध्ये कार्पोरेट कार्यालये असलेल्या या जगातील प्रथम क्रमांकाच्या बँकेत ‘5 Keys’ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱया बँकेच्या कर्मचाऱयाला हा पुरस्कार दिला जातो. 62 देशांमधील शाखांमध्ये कार्यरत असलेल्या 2 लाख 80 हजार कर्मचाऱयांमधून एकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा पुरस्कार मिळवणाऱया कर्मचाऱयाकडे यू. एस. गव्हर्नमेंट बँकिंग सर्टिफिकेशन, बँकेशी संबंधित असलेल्या ग्राहकांची पसंती, समस्या सोडविण्याची क्षमता, अर्थव्यवहाराशी संबंधित सखोल ज्ञान आणि इतर एकूण कामगिरी उत्तम असणे आवश्यक असते. हे सर्व गुण असणाऱया कर्मचाऱयाला हा प्रतिष्ठेचा ‘5 Keys’ अवॉर्ड दिले जाते. वरील सर्व कामगिरीचा विचार करून ही बँक दरवर्षी जगभरातील आपल्या 2 लाख 80 हजार कर्मचाऱयांमधून काही कर्मचाऱयांची निवड करते आणि त्यातून सर्वोत्कृष्ट अशा एका कर्मचाऱयाची निवड केली जाते.
62 देशांतील वेबसाईटवर सुषमा यांचे छायाचित्र झळकले
बँकेच्या वरिष्ठ पदावर काम करणाऱया सुषमा यांची सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करताना, त्यांनी भारतातून येऊन अवघ्या सात महिन्यांत बँकेने सोपवलेली अत्यंत महत्वपूर्ण अशी जबाबदारी अतिशय कौशल्याने पार पाडत ज्या प्रकारे सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावून दाखविली, त्याचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला. सुषमा यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून 10 जुलै रोजी त्यांच्या या यशोगाथेसोबत त्यांचे छायाचित्र ‘जे. पी. मॉर्गन’च्या जगभरातील 62 शाखांमधील वेबसाईटवर स्क्रीन सेव्हर म्हणून झळकले. आंतरराष्ट्रीय कार्पोरेट क्षेत्रातील हा फार मोठा सन्मान मानला जातो.
हा पुरस्कार कोव्हिडशी लढणाऱया भारतीय जनतेला अर्पण – सुषमा
आपल्या या कामगिरीबद्दल झालेला आनंद खास ‘तरुण भारत’ सोबत शेअर करताना सुषमा म्हणाल्या, ‘मला मिळालेला हा सन्मान हा माझ्या देशाचा, माझ्या महाराष्ट्राचा, माझ्या सिंधुदुर्गचा आणि विशेष म्हणजे माझ्या कुडाळचा, माझ्यावर संस्कार करणाऱया आई-बाबांचा, मला घडवणाऱया माझ्या मराठी शाळा आणि हायस्कूलचा आहे. या सगळय़ांचे आशीर्वाद, माझे पती रितेश पाटणकर व कुटुंबाने दिलेली साथ यामुळेच मी हे यश मिळवू शकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्याची धमक मराठी माणसात आणि त्यात मराठमोळय़ा महिलेतही असू शकते, हे मी सिद्ध करून दाखविले, याचा मला खूप आनंद आहे. माझ्या या कामगिरीतून मराठी तरुण-तरुणी निश्चितपणे प्रेरणा घेतील, अशी मला आशा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माझा हा पुरस्कार कोरोना आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करणाऱया माझ्या भारत देशातील सर्व कोव्हिड योद्धे आणि जनतेला अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा हय़ा माजी नायब तहसीलदार व माजी राज्य महसूल कर्मचारी नेते ठाकूर यांच्या कन्या, कोल्हापूर येथे आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राजक्ता ठाकूर यांच्या भगिनी, तर कुडाळ येथील व्यावसायिक पाटणकर यांच्या स्नुषा आहेत.