मूळ कळणे येथील सुवर्णा देसाई कॅनडातील ओटावा शहरात कुटुंबासह वास्तव्यास : भारताचे कौतुक
तेजस देसाई / दोडामार्ग:
कॅनडामधील ओटावा शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राहत असलेल्या व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून सामाजिक कार्य करणाऱया मूळ सिंधुदुर्गातील कळणे गावच्या सुकन्या सुवर्णा देसाई-हिरेमठ यांनी कॅनडात आपण राहत असलेल्या राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची परिस्थिती ओढावल्याचे सांगत आपल्या भारत देशात असा प्रसंग आला नाही, हे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. भारतवासीयांनी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी उचललेल्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले.
कॅनडामध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण 15 जानेवारीला ब्रिटिश कोलंबिया प्रोव्हीन्स राज्यामध्ये आढळला. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये झपाटय़ाने कोरोना पसरत गेला. आजपर्यंत कॅनडामध्ये 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर साधारण 280 रुग्णांचा बळी गेला आहे. आम्ही राहत असलेल्या ओंटारिओ राज्यामध्ये चार हजारावर रुग्ण आहेत. वरवर पाहता व इतर देशांच्या तुलनेने हे नगण्य वाटत आहे. परंतु योग्य काळजी न घेतल्यास हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती सुवर्णा यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, कोरोनाची पहिली झळ आम्हाला 11 मार्चला लागली. जेव्हा ओटावा शहरांमध्ये पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर अतिशय वेगाने चक्रे फिरत 17 मार्चला आपल्या राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली. तशी स्थिती भारतात नाही, हे खूप महत्वाचे आहे. येथे सर्व शाळा, महाविद्यालये प्रथम 5 एप्रिलपर्यंत व नंतर कदाचित मे किंवा जूनपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद करण्यात आली. सार्वजनिक ग्रंथालये, खासगी शाळा, बालसंगोपन केंद्रे, सिनेमागृहे, नाटय़गृहे, म्युझियम, प्ले ग्राउंड, उद्याने, जिम रिक्रियेशन सेंटर्स, बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले. परंतु घरपोच किंवा पार्सल घेऊन देण्याची सुविधा सुरू ठेवली.
प्रार्थना स्थळांसाठीही निर्बंध
अत्यावश्यक गरजा भागवणारी औषधांची दुकाने, ग्रोसरी स्टोअर्स (वाण सामान, भाजीपाला, फळे, दूध सर्व एकाच ठिकाणी मिळते), दवाखाने, इस्पितळे, पोलीस स्टेशन, अग्निशमक केंद्र सुरू ठेवण्यात आली. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे मेळावे आयोजण्यास किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. हे निर्बंध लग्न, सार्वजनिक कार्यक्रम अथवा प्रार्थना स्थळांनाही लागू करण्यात आले.
एकावेळी एकच ग्राहक दुकानात
विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले. इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये सर्वत्र योग्य अंतर (कमीत कमी दोन मीटर) राखण्यासाठी जागोजागी चिन्हं लावण्यात आली तसेच बऱयाच दुकानांमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी शॉपिंगसाठी खास वेळ राखून ठेवण्यात आला आहे. एका वेळेस एक असे ग्राहक दुकानात सोडण्यात येतात व जे रांगेत उभे असतात ते कमीत कमी सहा फूट अंतर ठेवतात. वाण सामान घरी आणल्यावर ते साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन किंवा पुसून ठेवतो. तसेच वारंवार स्वच्छ साबणाने हात धुतो. रोज घराचे दरवाजे, मोबाईल, कॉम्प्युटर, रिमोट कंट्रोलर जंतुनाशक फवारा वापरून निर्जंतुक करतो, आदी घेतली जाणारी खबरदारीही सुवर्णा यांनी विशद केली.
मुलांचा अभ्यास ऑनलाईन
सुवर्णा म्हणाल्या, हा अचानक झालेला बदल मुलांसाठी आणि आम्हा सुसहय़ करण्यासाठी आम्ही नित्य दिनक्रम आखला तसेच नेहमीच्या उठण्याच्या किंवा झोपायच्या वेळा नियमित ठेवल्या. मुलांच्या शाळा ऑनलाईन गुगल क्लासरुम किंवा मायक्रोसॉफ्ट टिम वगैरे वापरून सुरू केल्या. त्यामुळे अभ्यासाचे कमीत कमी नुकसान व मुलांना शिक्षक व वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत संवाद साधता येऊ लागला. याव्यतिरिक्त मुलांसोबत वेळ घालवतो. त्यांना मित्रपरिवाराची उणीव भासू नये म्हणून त्यांच्याशी विविध खेळ खेळतो. तसेच गोष्टींची पुस्तके वाचतो, गाणी ऐकतो एकमेकांच्या आवडीचे जिन्नस बनवितो. बैठे खेळ खेळतो, हस्तकलेच्या वस्तू, चित्र काढणे अशा वेगवेगळय़ा गोष्टींनी मुलांना सतत व्यस्त ठेवतो. जशी मुलांना सामाजिक जीवनाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आम्हा मोठय़ांनाही त्याची खूप गरज भासते. अशावेळी आम्ही दूरध्वनी, व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने एक दुसऱयाशी बोलतो. गप्पा मारतो. माझे पती पेशाने डॉक्टर असल्याने त्यांना घरून काम करणे शक्य नाही. परंतु जमेल त्याप्रकारे त्यांनीही तंत्रज्ञानाचा वापर आपल्या प्रॅक्टिसमध्ये केला आहे. ज्या पेशंटना दूरध्वनीने किंवा व्हीडिओ कॉन्फरन्सिंग कॉलने सल्ला देऊ शकतात, त्यांना ही सुविधा प्राप्त करून दिली आहे
घरच्या घरी व्यायाम
आमच्या अनुभवावरून मला असे वाटते की, या आजाराला न घाबरता संरक्षणात्मक उपायांचा अवलंबन करा. अनावश्यक घराबाहेर जाणे टाळा. स्वतःची व इतरांची काळजी घ्या. आजुबाजूला वयस्कर मंडळी असतील किंवा व्याधीग्रस्त मंडळी असतील, तर त्यांना योग्य ती मदत करा. सुरक्षित अंतर ठेवा. गरीब व गरजू लोकांना मदत करा. एकमेकांशी दूरध्वनी, व्हीडिओ कॉलद्वारे संपर्कात राहा. तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी प्राणायाम, योगासने करा, किंवा घरच्या घरी चाला. तसेच स्वच्छता राखा, थुंकू नका. योग्य माहितीवर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
रोख स्वरुपात दंड
लॉकडाऊन जरी कठीण काळ असला, तरी तो कटाक्षाने पाळा व लवकरात लवकर संसर्ग कमी करा. आशा बाळगूया की हे दिवस लवकर संपतील व जग पूर्वपदावर येईल, असेही आवाहन करीत कॅनडात सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याला घेऊन चालत असाल, तरीही रक्कम स्वरुपात दंड असल्याचेही सौ. सुवर्णा यांनी सांगितले.