जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील समितीला उपकरणे खरेदी, पदभरतीलाही मान्यता
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर गाजत असलेल्या कोविड लॅबच्या मंजुरीचा अध्यादेश अखेर शासनाने काढला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोविड लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी रेण्वीय विधान प्रयोगशाळा कोविड-19 आजाराचे निदान करण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडून शासन अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये माकडतापाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माकडतापामुळे जिल्हय़ात अनेक लोकांचे बळी गेले. त्यामुळे माकडतापाचे नमुने तपासणीसाठी जिल्हय़ात लॅब हवी, अशी मागणी होती. त्याप्रमाणे जिल्हय़ात लॅब मंजूरही झाली होती. यासाठी 8.5 कोटीचा निधीही उपलब्ध झाला होता. परंतु, या लॅबचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यानंतर आता कोरोनासारखा महाभयंकर विषाणू जगभर पसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ात त्याचा शिरकाव होताच सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा प्रादुर्भाव कमी असला, तरी आता जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. मात्र कोरोना नमुना तपासणीची प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये नसल्याने कोल्हापूरमध्ये नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. परंतु, त्याचा अहवाल येण्यास दोन ते चार दिवस लागत असल्याने जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हय़ात कोविड लॅब हवी, यासाठी सर्व स्तरातून मागणी सुरू झाली. त्या दृष्टीने प्रथमत: पालकमंत्र्यांनी गोवा येथे कोरोना नमुना तपासणीसाठी नमुने पाठविण्याबाबत चाचपणी केली. त्याला अपेक्षित यश आले नाही. त्यानंतर भाजपच्यावतीने पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब हवी, यासाठी जिल्हाधिकाऱयांना प्रस्ताव सादर करण्यात आला.
दरम्यान जिल्हय़ातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हय़ात कायमस्वरुपी कोविड लॅब होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात कोविड लॅब सुरू करण्यास मान्यता देताच जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजनमधून 61 लाख 63 हजाराचा निधीही मंजूर केला. तसा प्रस्ताव शासनाच्या प्रधान सचिवांकडे सादर केला. त्यानंतर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देऊन सिंधुदुर्ग जिल्हय़ात रेण्वीय निदान प्रयोगशाळा कोविड – 19 निदान करण्यासाठी लॅबची मंजुरी दिली आहे. त्याचा अध्यादेश मंगळवारी राज्याच्या प्रधान सचिवांकडून जारी करण्यात आला.
शासन अध्यादेशामध्ये म्हटले आहे की, रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथे आरटीपीसीआर तपासणीसाठी मान्यता देण्यात येत आहे. तसेच रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्गसाठी हाफकिन संस्थेकडे यापूर्वी दिलेल्या पुरवठा आदेशानुसार ज्या उपकरणांचा पुरवठा अद्याप झालेला नाही, त्या उपकरणांचा मर्यादित पुरवठा आदेश रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आरटीपीसीआर तपासणीसाठी प्रस्तावानुसार आवश्यक उपकरणे जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीस विहित अटी व शहती नुसार केंद्र शासन उपक्रम एचएलएल लाईफ केअर तसेच अन्य शासन उपक्रम केएपीएल लाईफ केअर तसेच अन्य राज्य शासनाच्या मेडिकल सर्व्हिस कार्पोरेशनच्या दर सूची किंवा एआयआयएमएस नागपूर यांच्या 18 मार्च 2020 च्या पुरवठा आदेशानुसार व जिल्हा नियोजन समितीने मान्य केलेल्या निधीतून खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 22 मार्च 2018 नुसार रेण्वीय निदान प्रयोगशाळा यांना विहित स्तरावरून पद भरती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये आता लवकरच कोविड लॅब सुरू होणार, हे स्पष्ट झाले आहे. तसेच ही लॅब मंजूर करून आणण्याच्या पालकमंत्री सामंत व आमदार नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान कोविड लॅब झाल्यास भविष्यात इतर वेगवेगळ्य़ा आजारांच्या नमुना तपासणीही याठिकाणी होणार असल्याचेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.