नव्याने 12 जणांचे नमुने तपासणीला पाठविले : 40 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
- 55 व्यक्ती आयसोलेशन वॉर्डमध्ये
- 185 व्यक्ती होमक्वारंटाईन मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमधून आणखीन 13 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर गुरुवारी आणखी 12 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले असून 40 जणांच्या कोरोना तपासणीचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 55 रुग्ण उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्ण नसला, तरी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोरोनाची थोडीफार लक्षणेही दिसणाऱयांचेही नमुने कोरोना तपासणी करून घेतले जात आहेत. त्यामुळे कोरोना नमुना तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 144 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 104 नमुन्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला असून एक पॉझिटिव्ह रिपोर्ट वगळता उर्वरित सर्व 103 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचाही निगेटिव्ह रिपोर्ट आला असल्याने जिल्हय़ात कोरोनाचा एकही रुग्ण सध्या नाही. मात्र जिल्हय़ात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचे सर्व्हे करण्याचे काम सुरुच असून सर्व प्रकारच्या दक्षता व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील नागरिकांनीही सतर्क राहून जिल्हय़ात कुणीही चुकून जरी बाहेरून व्यक्ती आल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात आजमितीस 435 व्यक्ती विलगीकरणात असून 390 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. 45 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 28 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 185 इतकी असून या व्यक्तींना होमक्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 55 व्यक्ती सध्या दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत गुरुवारी 2102 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱयांवर तसेच अवैधरित्या दारुविक्री करणाऱयांवर जिल्हा पोलीस दलामार्फत कडक कारवाई करण्यात येत असून सिंधुदुर्गात संचारबंदी शिथील झालेली नाही. 3 मेपर्यंत संचारबंदी कायम लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करू नये. उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हय़ात सर्व बाजारपेठा बंद असूनसद्धा काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानेही सुरू करण्यात येत असल्याचे काही लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या सूचना व आदेशांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
घरीच अलगीकरण 0390
संस्थात्मक अलगीकरण 0045
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0144
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0104
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0103
अलवाल प्राप्त न झालेले नमुने 0040
विलगीकरण कक्षात दाखल 0055
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
गुरुवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2102