वाडा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित : जिल्हाधिकाऱयांची माहिती : पाचव्या कोरोना बाधित रुग्णाच्या 36 व्यक्ती संपर्कात
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
देवगड तालुक्यातील वाडा येथे सापडलेल्या 51 वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात 36 व्यक्ती आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 11 व्यक्ती अतिजोखमीच्या आहेत. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर वाडा येथील तीन किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन आरोग्य खात्यामार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली. दरम्यान जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व्यक्तींची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागली असून परराज्यातून व महाराष्ट्राच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्गात तब्बल 3176 व्यक्ती दाखल झाल्या आहेत, अशी माहितीही देण्यात आली.
वाडा येथील महिला कोरोना बाधित झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. सिंधुदुर्गात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली. त्यामुळे जिल्हय़ात पुन्हा एकदा खळबळ उडाली. त्यानंतर त्या महिलेच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात आला असता एकूण 36 व्यक्ती या रुग्णाच्या संपर्कात आल्या असून त्यातील 11 व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील, तर 25 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. अतिजोखमीच्या संपर्कातील 11 व्यक्तींपैकी दोन व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून आणखी नऊ व्यक्तींचे नमुने बुधवारी घेण्यात येणार आहेत. अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले असून कमी जोखमीच्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
कोरोना बाधित महिला सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील सहा व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन ठेवण्यात आले असून देवगड तालुक्यातील वाडा येथे तीन किलोमीटरचा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ करून या परिसरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
पाचव्या रुग्णालाही आंबा वाहतुकीचा इतिहास
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील 27 वर्षीय युवक मुंबईला आंबा वाहतूक करणारा चालक होता. तो कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आता वाडा येथील 51 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. तिचा मुलगा मुंबईत वाशी मार्केटला आंबा वाहतूक करूनच आला असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना बाधित पाचव्या रुग्णाचेही मुंबई कनेक्शन व आंबा वाहतुकीचा इतिहास असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या कोरोना बाधित महिलेच्या मुलाने 20 एप्रिल ते 5 मेदरम्यान मुंबई येथे आंबा वाहतूक करून व्यवसाय केला आहे. लक्षणे जाणवू लागल्यामुळे सध्या बाधित झालेली महिला, तिचा मुलगा व सून यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. पैकी मुलगा व सून यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला असून फक्त या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला ही तिच्या मुलाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याचे दिसून येते, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हय़ात 964 व्यक्ती क्वारंटाईनमध्ये
सध्या जिल्हय़ात एकूण 964 व्यक्ती अलगीकरणात असून 647 व्यक्ती गृह अलगीकरणात, तर 317 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 819 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 813 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 808 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमधून आणखी 37 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अजून सहा नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 63 रुग्ण दाखल आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये कमी झालेल्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून 37 रुग्णांची वाढ झाल्याने आयसोलेशनमध्ये रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6058 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात आढळलेल्या पाच कोरोना बाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्याबाहेर जाण्यासाठी 18274 व्यक्तींची नोंदणी
राज्याबाहेर जाण्यासाठी 18 हजार 274 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱयांना पाठविण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱया व्यक्तींनी त्यांच्या संबंधित राज्याच्या लिंकवर जाऊन नोंदणी करून पास प्राप्त करून घेण्याविषयी संबंधित राज्य शासनांनी कळविले आहे. त्या बाबतच्या लिंकची माहिती संबंधित राज्यांनी जिल्हा प्रशासनास कळविली आहे. तसेच ही माहिती पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एस. एम. एस. च्या माध्यमातून कळविण्यात आली आहे. तसेच 12 हजार 762 व्यक्तींची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून संबंधित राज्य शासनांना त्यांना प्रवेश देण्याविषयी कळविण्यात आले आहे. यामध्ये आंध्रप्रदेश 74, बिहार 594, छत्तीसगड 20, दिल्ली 2, गोवा 1069, गुजरात 111, हरियाणा 21, हिमाचल प्रदेश 2, जम्मू काश्मिर 2, झारखंड 492, कर्नाटक 4990, केरळ 89, मध्य प्रदेश 807, मेघालय 4, ओडिसा 179, पंजाब 3, राजस्थान 784, तामिळनाडू 26, तेलंगणा 35, उत्तर प्रदेश 2792, उत्तरांचल 27, पश्चिम बंगाल 628, दिव व दमण 1 अशा व्यक्तींचा समावेश आहे.
सिंधुदुर्गात 3176 व्यक्ती दाखल
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा जिल्हय़ात जाण्यासाठी सुमारे 400 पास मंजूर करण्यात आले आहेत. या पासच्या माध्यमातून सुमारे 1100 व्यक्ती जिल्हय़ाबाहेर जाणार आहेत. तर परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 3 हजार 176 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
घरीच अलगीकरण 0647
संस्थात्मक अलगीकरण 0317
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0819
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0813
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0005
निगेटिव्ह आलेले नमुने 0808
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0006
विलगीकरण कक्षात दाखल 0063
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0003
मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 6058