जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या झोनच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, 29 एप्रिल रोजी जिल्हय़ात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा अद्यापही ऑरेंज झोनमध्येच असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
कोरोना आजाराचा एकही रुग्ण नसलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये, 1 ते 15 संख्येपर्यंत रुग्ण असल्यास तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये व 15 पेक्षा जास्त रुग्ण असणारे जिल्हे रेड झोनमध्ये येत असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. पहिला रुग्ण सापडल्यानंतर व त्याची तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्याच्या दिवसापासून पुढे 28 दिवसात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्यास एकही कोरोना पॉझिटिव्ह नसल्याच्या निकषानुसार ऑरेंज झोनमधील जिल्हा ग्रीन झोनमध्ये जातो. सिंधुदुर्गात 25 मार्च रोजी आढळलेला रुग्ण बरा झाल्याने शासन निकषानुसार जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत होता. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने केंद्र शासनाला पाठविली होती.
ग्रीन झोनमध्ये जाण्यास मोजकेच दिवस शिल्लक असतानाच केंद्र शासनाने जिल्हानिहाय झोन यादी प्रसिद्ध केली आहे. 30 एप्रिल रोजीच्या या यादीत सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला गेला आहे. दरम्यान, ग्रीन झोनच्या उंबरठय़ावर असतानाच 29 एप्रिल रोजी नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.
केंद्र शासनाने यादी जाहीर करण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हय़ात सापडलेल्या दुसऱया कोरोना रुग्णाची माहिती केंद्र शासनाला पोहोचली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोनच्या यादीत दाखविण्यात आला. परंतु आता एक पॉझिटिव्ह रुग्ण असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्येच राहिला आहे. याविषयी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.