प्रतिनिधी / कोल्हापूर
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचा छडा कोल्हपुरात लागला. कोंडीग्रे फाटा येथे संशयितरित्या फिरताना दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि इचलकरंजी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झाडझडती घेतली असता त्यांनी सिंधुदूर्गात केलेल्या चेन स्नॅचिंगची कबुली दिली. सतीश मुकुंद पवार (वय 32, रा. नांदणी रोड, कागडे मळा, जयसिंगपूर ता. शिरोळ, मुळगांव तीनबत्ती चौक दौलतनगर, कोल्हापूर), राजू नामदेव पाटील (वय 30 नांदणी रोड, संभाजीनगर, जयसिंगपूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना पुढील तपासाकरीता सिंधुदूर्गनगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील राणेवाडी गावच्या बसस्टॉपवरुन सुंदरा विष्णू पालव वय 75, रा. राणेवाडी हुमरमळा, ता. कुडाळ या नात नुपुर हिला स्कुलबसमधून घेवून घरी जात होत्या. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पालव यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसडा मारुन लंपास केले. यासंदर्भात दोन अज्ञातांवर सिंधुदूर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इचलकरंजी पोलीस पथकाकडून ऑलआऊट ऑपरेशन अंतर्गत इचलकरंजी व जयसिंगपूर उपविभागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी कोंडिग्रे (ता. शिरोळ) फाटा येथील हॉटेल कॉर्नरसमोर दोघे संशयित विना नंबरप्लेटची मोटरसायकल घेवून उभारल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तर मिळाले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्याचा दागिना मिळून आला. अधिक चौकशी केली असता त्यांनी सिंधुदूर्गातील गुन्हÎाची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याचा दागिना आणि मोटरसायकल असा 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अंमलदार महेश खोत, खंडेराव कोळी, राजीव शिंदे, संजय इंगवले, अमर शिरढोणे, बालाजी पाटील, फिरोज बेग, सुरज चव्हाण यांनी कारवाई केली.