महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचापुरस्कार
ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने गेले दिड वर्ष कोविड १९ प्रतिबंध उपाययोजनासह आजपर्यंत समाजहितासाठी विविध उपक्रमांमधून सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील निवडक अशा १० संस्थाना गौरविण्यात आले. यात कोकणातून एकमेव सिंधुमित्र प्रतिष्ठानची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभाग मंत्री अमित देशमुख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे, सचिव नंदकुमार सुतार, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे सचिव भार्गवराम शिरोडकर आणि सहसचिव अँड्र्यू फर्नांडिस उपस्थित होते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सर्वसमावेशक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविण कुमार ठाकरे यांची राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.