वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड
भारताची वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जेतेपदाच्या लढतीत तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिनने पराभूत केले.
एकतर्फी झालेल्या या लढतीत ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या मारिनने सिंधूचा 21-12, 21-5 असा केवळ 35 मिनिटांत धुव्वा उडवित या वर्षातील तिसरे जेतेपद पटकावले. मारिनच्या वेगवान व अचूक खेळासमोर सिंधूला टिकाव धरता आला नाही. मारिनकडून झालेला सिंधूचा हा सलग तिसरा पराभव आहे. गेल्या जानेवारीत थायलंडमध्ये झालेल्या दोन सुपर 1000 स्पर्धांत मारिनने जेतेपद पटकावले तर वर्ल्ड टूर फायनल्समध्ये उपविजेतेपद मिळविले होते. मारिन सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱया तर सिंधू सातव्या स्थानावर आहे.