टोकियो ऑलिम्पिक- हॉकीमध्ये महिला संघाची निराशा, बॅडमिंटनपटू बी. साई प्रणितचे आव्हान संपुष्टात
टोकियो / वृत्तसंस्था
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, तिरंदाजीत दीपिका कुमारी व बॉक्ंिसगमध्ये पूजा राणी यांनी धडाकेबाज विजय मिळवत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या आशाअपेक्षा आणखी पल्लवित केल्या आहेत. पीव्ही सिंधू साखळी फेरीतील सलग दुसऱया विजयासह आता महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. याचवेळी बी. साई प्रणितचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
यापूर्वी, 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूने टोकियोतही धडाकेबाज खेळ साकारत आपल्या मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी तिने हाँगकाँगच्या चेऊंगला 21-9, 21-16 अशा फरकाने पराभूत करत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सिंधूसाठी चेऊंगविरुद्ध हा सलग 6 वा विजय ठरला. आता पुढील फेरीत सिंधूची लढत डेन्मार्कच्या ब्लिचफेल्टविरुद्ध होईल. ब्लिचफेल्ट जागतिक मानांकन यादीत 12 व्या स्थानी विराजमान आहे. सिंधूने तिच्याविरुद्ध देखील 4-1 असे वर्चस्व गाजवले आहे. ब्लिचफेल्टने या वर्षाच्या प्रारंभी योनेक्स थायलंड ओपनमध्ये सिंधूविरुद्ध एकमेव विजय संपादन केला आहे.
हैदराबादच्या 6 व्या मानांकित सिंधूने यापूर्वी पहिल्या फेरीत इस्रायलच्या पोलिकार्पोव्हाला सहज पराभूत केले होते. तोच धडाका तिने येथे दुसऱया फेरीतही कायम राखला. सिंधूने पहिल्या फेरीत 6-2 अशी आघाडी घेतली आणि ती 10-3 अशी भक्कम देखील केली. मध्यंतरावेळी ती 11-5 फरकाने आघाडीवर होती. नंतरही हाच धडाका ठेवण्यात तिला फारशी अडचण आली नाही आणि ती 21-9 फरकाने पहिला गेम जिंकण्यात यशस्वी ठरली. त्या तुलनेत दुसरा सेट अधिक संघर्षपूर्ण ठरला. चेऊंगने सामन्यातील अस्तित्व कायम राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, यातही अंतिमतः सिंधूच बाजी मारुन गेली आणि तिने 21-16 अशा फरकाने विजयश्री मिळवून बाद फेरीत धडक मारली.
पुरुष एकेरीत बी. साई प्रणित मात्र स्पर्धेबाहेर फेकला गेला. प्रणितला नेदरलँड्सच्या मार्क कॅल्जोविरुद्ध 14-21, 14-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असलेल्या प्रणितला यापूर्वी पहिल्या साखळी सामन्यात देखील इस्रायलच्या झिल्बरमनविरुद्ध पराभवाचा धक्का सोसावा लागला होता.
दीपिका कुमारीची जेनिफरवर एकतर्फी मात, तरुणदीप, प्रवीणचे आव्हान संपुष्टात
तिरंदाजीत जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित दीपिका कुमारीने दडपणाखाली उत्तम खेळ साकारत अमेरिकेची टिनेजर जेनिफर म्युसिनो-फर्नांडेझविरुद्ध 6-4 अशा फरकाने विजय मिळवला आणि महिलांच्या वैयक्तिक गटात उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तरुणदीप राय व प्रवीण जाधव यांना मात्र दुसऱया फेरीत पराभव पत्करावे लागले.
दीपिकाला पहिल्या टप्प्यात अजिबात सूर सापडला नव्हता. तिचे अनेक नेम रेड झोनमध्ये होते. मात्र, नंतर तिने आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली आणि विजय खेचून आणला. त्यापूर्वी पहिल्या फेरीत दीपिकाने भूतानच्या कर्माला 6-0 अशा एकतर्फी फरकाने नमवले होते. ऑलिम्पिक पदार्पणवीर प्रवीण जाधवने वर्ल्ड चॅम्पियन ब्रॅडी एलिसनकडून पराभव पत्करण्यापूर्वी जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित गॅल्सनला पराभवाचा धक्का देत अनपेक्षित निकाल नोंदवला.
अनुभवी तरुणदीप रायला मात्र इस्रायलच्या शॅनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. शेवटची ऑलिम्पिक असल्याने दुसऱया फेरीतील हा पराभव त्याच्यासाठी आणखी जिव्हारी लागणारा ठरला.
पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक
दोनवेळची आशियाई चॅम्पियन, भारतीय मुष्टियोद्धा पूजा राणी हिने 75 किलोग्रॅम वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. तिने अल्जेरियाच्या इचरॅक चैबविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय संपादन केला. पूजा राणी हिच्यासाठी ही पदार्पणाची ऑलिम्पिक आहे.
या लढतीतील तिन्ही फेऱयांमध्ये राणीने जोरदार काऊंटर ऍटॅक साकारत दमदार खेळ साकारला. तिचे वाईल्ड स्विंग्ज तर प्रतिस्पर्धी चैबला कळाले देखील नाहीत. आता पुढील फेरीत राणीची लढत ऑलिम्पिक कांस्यजेती, दोनवेळची आशियाई चॅम्पियन व माजी विश्व सुवर्णजेती लि क्वियानविरुद्ध होईल. चीनची लि व राणी यांच्यातील हा सामना दि. 31 रोजी खेळवला जाणार आहे. आज, मुष्टियुद्धात एमसी मेरी कोम उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या व्हॅलेन्सियाविरुद्ध लढणार असून या लढतीचे देखील मुख्य आकर्षण असणार आहे.
रोव्हर्स अर्जुन व अरविंद फायनलमध्ये पात्र ठरण्यात अपयशी
भारतीय नौकानयनपटू अर्जुन लाल जाट व अरविंद सिंग यांना पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्सची फायनल गाठण्यात अपयश आले. 6 संघांच्या फायनलमध्ये ते सर्वात शेवटच्या स्थानी फेकले गेले. सी फॉरेस्ट वॉटर वे येथे झालेल्या या इव्हेंटमध्ये पहिले 3 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.