क्वालालंपूर / वृत्तसंस्था
आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी बॅडमिंटनचे ड्रॉ जाहीर झाले असून यात सिंधूला सहावे तर प्रणितला 13 वे मानांकन दिले गेले आहे. रिओ स्पर्धेतील रौप्यजेती सिंधू तुलनेने सोप्या गटात आहे. मात्र, ही ऑलिम्पिक आहे आणि ऑलिम्पिकमधील प्रत्येक लढत महत्त्वाची असते, असे तिने याप्रसंगी नमूद केले आहे.
महिला एकेरीत सिंधूचा जे गटात समावेश आहे. प्रणित 13 व्या मानांकनासह पुरुष एकेरी डी गटात आहे. साखळी फेरीत सिंधूची लढत हाँगकाँगच्या 34 व्या मानांकित चेऊंग यी व इस्रायलची 58 वी मानांकित क्सेनिया पोलिकार्पोव्हाविरुद्ध होईल. प्री-क्वॉर्टरफायनलमध्ये सिंधूची लढत डेन्मार्कच्या 14 व्या मानांकित मिया ब्लिचफेल्टविरुद्ध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुरुष एकेरीत प्रणितला नेदरलँड्सच्या 29 व्या मानांकित मार्क कॅल्जो व त्यानंतर इस्रायलच्या 47 व्या मानांकित मिशा झिल्बरमनविरुद्ध लढावे लागेल. साखळी फेरीअखेर अव्वलस्थानी राहता आले तर त्याची पुढील लढत सी गटातील विजेत्याशी होईल.
चिराग-सात्विकची बिकट वाटचाल
या तुलनेत चिराग व सात्विकराज यांना मात्र कठीण ड्रॉ मिळाला आहे. टॉप सिडेड इंडोनेशियन जोडी केव्हिन सुकामुल्जो-मार्कस गिडेऑन, चायनीज तैपेईचे जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित ली यांग-वांग ची लिन, इंग्लंडचे 18 वे मानांकित बेन लेन व सीन वेन्डी यांचा त्यांना सामना करावा लागेल.
या जोडीला साखळी फेरीत अव्वलस्थान प्राप्त केले तर डी ग्रूपमधील रनर्स अप द्वितीय मानांकित मोहम्मद अहसान व हेंद्रा सेतियावन यांच्याविरुद्ध कोर्टवर उतरावे लागू शकते. याशिवाय दुसऱया स्थानी राहिल्यास ब गटातील विनर्सविरुद्ध त्यांची आणखी कसोटी लागू शकते. हिरोयुकी एण्डो व युता वातान्बे हे ब गटातील विनर्स ठरु शकतात.
एकेरी गटात साखळी फेरीअखेर अव्वल खेळाडू बाद फेरीत पोहोचेल. महिला एकेरीत चायनीज तैपेईच्या तई झू यिंगला थुए लिन्ह न्युएन (व्हिएतनाम), क्वि क्झुफेई (फ्रान्स) व सबरिना जॅक्वेट (स्वित्झर्लंड) यांचे आव्हान मोडीत काढावे लागेल, असे चित्र आहे. प्रत्येक ग्रूप विनरला बाद फेरीतील पहिल्या फेरीत बाय मिळणार आहे. तईप्रमाणेच पाचवी मानांकित रॅटचानॉक इन्टेनॉन व 14 वी मानांकित ग्रेगरिया मारिस्का तुन्जूंग यांचेही स्पर्धेत तगडे आव्हान असणार आहे.
इजिप्तची दोहा हॅनी ही तिन्ही कॅटेगरीतून स्पर्धेत उतरणारी एकमेव खेळाडू असून महिला एकेरीत तिचा अव्वलमानांकित चेन यू फेई व तुर्कीच्या नेस्लिहान यिगितसह ए ग्रूपमध्ये समावेश आहे. पुरुष एकेरीत ऑलिम्पिक कांस्यजेता व्हिक्टर ऍक्सेल्सन, माजी ऑल इंग्लंड चॅम्पियन शि यू क्वि व आशियाई सुवर्णजेता जोनातन ख्रिस्ती आपापल्या गटात अव्वलस्थान संपादन करत बाद फेरी गाठण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतील.
विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन चेन लाँगसाठी स्पेनचा पॅबलो ऍबियन व इस्टोनियाचा रॉल मस्ट हे गटांतर्गत प्रतिस्पर्धी असतील. पहिल्या नॉकआऊट राऊंडमध्ये चेन लाँगची लढत ऑल इंग्लंड चॅम्पियन ली झी जियाविरुद्ध होऊ शकते.
कोटस
मला अतिशय सोपा ड्रॉ मिळाला आहे, हे कबूल करावे लागेल. मात्र, ही ऑलिम्पिक आहे आणि ऑलिम्पिकमधील प्रत्येक पॉईंट, प्रत्येक लढत अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. प्रत्येक सामन्यागणिक गेमप्लॅन ठरवत जाणे, हीच मुख्य रणनीती असेल.
-आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू
अशी असेल गटांतर्गत रचना
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंगल्स कॅटेगरीत 42 स्पर्धकांचा समावेश असून त्यांना 14 गटात विभागले गेले आहे. साखळी फेरीअखेर या 14 गटातील प्रत्येकी 1 अव्वल खेळाडू बाद फेरीसाठी पात्र ठरेल. याशिवाय डबल्स कॅटेगरीत 16 जोडय़ा 4 गटात विभागण्यात आले असून साखळी फेरीअखेर प्रत्येक गटातील 2 जोडय़ा शेवटच्या 8 मध्ये दाखल होतील. बॅडमिंटन सामन्यांना 24 जुलैपासून सुरुवात होणार आहे.