वृत्तसंस्था/ हैद्राबाद
भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू विश्वविजेती पी. व्ही. सिंधू, बी. साईप्रणित आणि एन. सिक्की रेड्डी यांनी शुक्रवारपासून येथील ‘साई’च्या पी. गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत आपल्या सरावाला प्रारंभ केला. कोरोना महामारीमुळे तब्बल चार महिने भारतीय बॅडमिंटनपटू सरावापासून वंचित राहिले होते.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे आठ अव्वल बॅडमिंटनपटूंसाठी प्रशिक्षण सराव शिबिर शक्मयतो लवकर सुरू करण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने (साई) घेतला. दरम्यान, तेलंगणा शासनाकडून बॅडमिंटन सराव शिबिरासाठी 1 ऑगस्ट रोजी अधिकृत मान्यता मिळाली होती. 2021 साली होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताला अधिक सुवर्णपदकांची संधी उपलब्ध झाली आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू कोरोना महामारीमुळे तब्बल चार महिने सराव करू शकले नव्हते. पण त्यांना आता आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने आपण समाधानी असल्याचे प्रमुख राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी सांगितले.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणारी भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, विश्वविजेती पी. व्ही. सिंधू, पुरुष एकेरीतील माजी टॉपसीडेड किदाम्बी श्रीकांत, महिला दुहेरीतील बॅडमिंटनपटू अश्विनी पोनाप्पा आणि पुरुष दुहेरीतील जोडी चिराग शेट्टी, त्याचप्रमाणे सात्विक साईराज यांच्याकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. सायना नेहवाल ही हैदाबादची रहिवासी आहे. त्यामुळे शुक्रवारी ती सराव शिबिरात सहभागी झाली नव्हती. या सराव प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणारे अन्य बॅडमिंटनपटू आपल्या निवासस्थानाकडून लवकरच हैद्राबादमध्ये दाखल होणार आहेत. सरावाच्या पहिल्या दिवशी सिंधूला पी. गोपीचंद आणि विदेशी प्रशिक्षक पार्क तेई सँग यांनी मार्गदर्शन केले. सिंधूने सकाळी दोन तास बॅडमिंटनचा सराव केला. आता आठवडाभराच्या कालावधीत ती प्रत्येक दिवशी नियमितपणे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचा सराव करणार आहे. सायंकाळच्या सत्रात ती आपली शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी व्यायाम घेणार आहे. पी. व्ही. सिंधूची शारीरिक तंदुरुस्ती पूर्णपणे फिट असल्याचे तिचे वडील पी. व्ही. रमण यांनी सांगितले. प्रणित आणि सिक्की यांनी सिंधूनंतर दोन तास बॅडमिंटनचा सराव केला. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने यापूर्वी हैद्राबादमध्ये 1 जुलैपासून राष्ट्रीय सराव शिबिर भरविण्याची योजना आखली होती. पण राज्य शासनाकडून या शिबिराला मान्यता मिळाली नसल्याने सदर शिबिर पुढे लांबणीवर टाकावे लागले.
कोरोना महामारी नियमावलीनुसार या सराव शिबिरावेळी सर्व प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. सोशल डिस्टन्स, मास्क याचा वापर सक्तीने करण्यात आला आहे. या अकादमीमध्ये सराव शिबिरासाठी लागणाऱया सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रक कोलमडले गेले. त्यानंतर ते पुन्हा नव्याने गेल्या मे महिन्यात तयार करण्यात आले होते. पण आतापर्यंत कोरोनामुळे एकही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा झालेली नाही.