वृत्तसंस्था/ बँकॉक
मंगळवारपासून येथे सुरू होणाऱया टोयोटा पुरस्कृत थायलंड खुल्या सुपर 1000 पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात बँकॉकमध्ये झालेल्या आशिया बॅडमिंटन टूरवरील टप्प्यातील पहिल्या सामन्यात सिंधू आणि सायना यांची कामगिरी निराशजनक झाली होती.
आशिया बॅडमिंटन टूरवरील गेल्या आठवडय़ात येथे झालेल्या योनेक्स पुरस्कृत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूना तंदुरूस्तीसाठी झगडावे लागले होते तसेच भारताच्या एकाही स्पर्धकाला दुसरी फेरी पार करता आली नाही. मंगळवारपासून सुरू होणाऱया बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टशी सायना नेहवालचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या ओ.बुसानेनशी होणार आहे. पुरूष एकेरीत भारताच्या प्रणितची पहिल्या फेरीतील लढत मलेशियाच्या लिव्युशी तर के. श्रीकांतचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या एस. थेमासीनशी होणार आहे.