कमलप्रीत कौरची अंतिम फेरीतील धडक व हॉकीतील विजय वगळता भारतासाठी निराशाजनक दिवस
टोकियो / वृत्तसंस्था
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूचे बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिलेवहिले सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न शनिवारी उपांत्य फेरीतील पराभवामुळे भंगले. चायनीज तैपेईची जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित तई त्झू यिंग हिने सिंधूला 21-18, 21-12 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. सिंधूसाठी कांस्यपदकाचे आव्हान मात्र कायम असून ती आज (रविवार दि. 1) तिसऱया स्थानासाठी प्ले-ऑफ लढतीत चीनच्या हे बिंग जियाव हिच्याविरुद्ध लढणार आहे.
अलीकडील कालावधीत सर्वात सातत्यपूर्ण खेळाडूंपैकी एक व मागील 5 वर्षात जवळपास प्रतिष्ठेच्या सर्व स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱया सिंधूला येथे निर्णायक उपांत्य लढतीत तई त्झू हिच्याविरुद्ध मात्र कोंडी फोडता आली नाही.
सिंधूसाठी तैवानीज तई त्झू यिंग हिच्याविरुद्ध पत्करलेला हा 14 वा पराभव ठरला. उभयतात आजवर 19 लढती झाल्या असून मागील सलग तीनही लढतीत सिंधूच्या पदरी निराशाच आली आहे. तई त्झू हिने आक्रमक खेळ साकारत सिंधूला बरेच जेरीस आणले. विशेषतः नेटवरील तिचा खेळ अतिशय काटेकोर स्वरुपाचा राहिला.
सिंधू व तई त्झू यिंग यांच्यात अनेक प्रदीर्घ रॅलीज रंगल्या. सिंधूने पहिल्या गेममध्ये एकवेळ 7-3 अशी आघाडी मिळवून ती पहिल्या ब्रेकपर्यंत कायम राखली होती. तई त्झू हिच्याकडून नेटवर काही चुका होत राहिल्याने त्याचा लाभ घेत सिंधू ब्रेकवेळी 11-8 अशा फरकाने आघाडीवर होती. मात्र, ब्रेकनंतर तई त्झूने आपला खेळ अचानक सुधारला आणि खोलवर फटके खेळत सिंधूला दडपणाखाली आणले. एकवेळ 11-11 अशी असलेली बरोबरी बऱयाच झुंजीनंतर 18-18 पर्यंत कायम होती. त्यानंतर तई त्झू हिने सलग 3 गुण मिळवत 21-18 अशी बाजी मारली. फोरहँड स्मॅश फटक्यावर तिने पहिला गेम आपल्या खात्यावर केला.
दुसऱया गेममध्ये सिंधूने शक्य तिथे गुण मिळवत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्मविश्वास दुणावलेल्या तई त्झू हिने दुसऱया गेममध्ये आक्रमक फटके खेळत आपली आघाडी सातत्याने भक्कम करत नेली. तई त्झू हिचे क्रॉस कोर्ट स्मॅशेस विशेष लक्षवेधी ठरले आणि याच बळावर ती यशस्वी होत गेली. तिच्या आक्रमक टॉसेस व अँगल्ड रिर्टन्सवर सिंधू निष्प्रभ ठरली.
दुसऱया गेममध्ये तईने ब्रेकवेळी 11-7 अशी आघाडी घेतली होती. ती तिने पुढेही कायम राखली. अर्थात, तई त्झू हिचे क्रॉस कोर्ट फटके सिंधूच्या बॅकहँडवर येत राहिले आणि इथे देखील सिंधूचा नाईलाज झाला. यापूर्वी, शुक्रवारी सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला उपांत्यपूर्व फेरीत नमवत आगेकूच केली होती.