प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर व परिसरात गर्द झाडी असल्याने व अजिंक्यतारा किल्ला परिसरानजिक असलेल्या रहिवाशी वस्तीत, उपनगरात बिबटय़ाचा वावर आहे. सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील महामुनी नावाचे कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना चक्क बिबटय़ाचे दर्शन झाल्याने मोठी खळबळ उडाली. जिल्हाधिकारी शेखर सिहांच्या कार्यालयात दर्शन देवून गेलेल्या बिबट्याची शोध मोहीम रात्रभर सुरु होती. त्यात पावसाने अडथळा आणला तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता.
बिबट्या दिसल्याचे महामुनी यांनी रात्रपाळीच्या वॉचमन, शिपायांना सांगितले. वॉचमनने ही घटना वनविभागाला कळवल्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास वनविभागाने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बिबटय़ाला पकडण्याच्या साहित्यासह धाव घेतली. तोपर्यंत मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे त्या अगोदरच उपस्थित राहिले होते. त्यांनी बिबटय़ाच्या पंजाचे ठसे मिळतात का हे पाहणे सुरु केले होते. मात्र, रात्री पावसाने देखील जोर धरल्याने बिबटय़ाचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. वनविभागाचे अधिकारी चव्हाण, सुहास भोसले यांच्यासह 15 ते 20 कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र, बिबटय़ा आढळून आला नाही. मात्र, त्याच्या 3 इंच लांबीचे पंजाचे ठसे आढळून आल्याने गांभीर्य वाढले होते. रात्रीची वेळ, रिमझिम पावसात रात्री 12 वाजेपर्यंत वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बिबटय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबटय़ा आढळून आला नाही.