कृत्रिम गर्भधारणा ही मानवासाठी काही नवी बाब राहिलेली नाही. अशा प्रकारे जन्म होणाऱयांसाठी ‘टेस्ट टय़ूब बेबी’ अशी संज्ञा आहे. मानवामध्ये कृत्रिम गर्भधारणा हा प्रकार रूळलेला असला तरी अनेक प्राण्यांच्या प्रजातींमध्ये मात्र अशा प्रकारे पुनरूत्पादन करणे अतिशय जटील असते. कित्येक प्रजातींमध्ये तर ते अशक्यच मानले जाते. सिंह ही अशीच एक प्रजाती आहे.
मात्र, सिंगापूरच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्राचा उपयोग करून तेथे दक्षिण आशियातील पहिल्याच सिंहाच्या बछडय़ाचा जन्म ‘घडविण्यात’ आला आहे. सिंहाच्या बाबतीत अशा प्रकारे पुनरूत्पादन ही क्वचितच घडणारी घटना आहे.
दक्षिण आफ्रिकेत 2018 मध्ये अशा प्रकारे सिंहाच्या दोन बछडय़ांचा जन्म झाला होता. ते दोन्ही बछडे आता मोठे झाले आहेत. सिंहाची संख्या जगभरात केल्या दोन दशकांमध्ये जवळपास 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे तो असमतोल दूर करण्यासाठी कृत्रिम गर्भधारणेचे प्रयोग करण्यात येत आहेत. सध्या जगभरात केवळ 23 हजार ते 39 हजार पूर्ण वाढ झालेले सिंह शिल्लक असावेत असे अनुमान आहे. यापैकी बहुतेक सिंह आफ्रिका आणि भारतातच आहेत. सिंगापूरमध्ये जन्मलेल्या बछडय़ाचे नाव ‘सिंबा’ असे ठेवण्यात आले आहे.