क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना एनके टर्फ फुटबॉल मैदानावर दुसऱया सुपर चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दादा एफसीने एसपी सुपर एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून जेतेपद मिळविले. रघु आनंदाचेला स्पर्धेतील उत्कृष्ट फुटबॉलपटूचा बहुमान मिळाला.
जिमखाना एनके टर्फ मैदानावर आयोजित या फुटबॉल स्पर्धेत 40 संघांनी भाग घेतला होता. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात दादा एफसी संघाने ब्रेटवेट एफसी संघाचा 2-0 असा पराभव केला तर दुसऱया उपांत्य सामन्यात एसपी सुपर एफसीने यंग बॉईज संघाचा 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात दादा स्पोर्ट्सने एसपी सुपर एफसी संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला दादा स्पोर्ट्च्या रघु आनंदाचेने गोल करून आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 27 व्या मिनिटाला एसपी सुपरच्या ज्युनेदने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. खेळ संपण्यास 1 मिनीट बाकी असताना रघु आनंदाचेच्या पासवर राहुल गुरवने निर्णायक गोल करून दादा एफसीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एसपी सुपर संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, चंद्रकांत कडोलकर, आशिष पाटील, शुभम यांच्या हस्ते विजेत्या दादा संघाला रोख 15 हजार रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या एसपी सुपर एफसी संघाला 10 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू रघु आनंदाचे (दादा एफसी), उत्कृष्ट गोलरक्षक अमित कसोटी (एसपी सुपर एफसी), स्पर्धेत सर्वाधिक गोल राहुल गुरव (दादा एफसी), उगवता संघ फास्ट फॉरवर्ड ज्युनियर्स, शिस्तबद्ध संघ यंग बॉईज एफसी संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजेता स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱयांनी विशेष प्ररिश्रम घेतले.