स्वीडनमध्ये अनोखा उपक्रम
होणार मोठी बचत
रस्ते आणि चौकांमधील सफाईवर वाढणारा खर्च कमी करण्यासाठी स्वीडनमधील एक शहर सोडरताल्जेच्या रस्ते आणि चौकांमधून सिगारेटची थोटकं उचलविण्यासाठी कावळय़ांची भरती केली जातेय. हे कावळे सिगारेटची थोटकं जमा करण्याचे काम करतात. सिगारेटचा एक तुकडा आणून दिल्यावर त्यांना अन्न दिले जाते.
काही कावळे स्टॉकहोमनजीक असलेल्या सोडरताल्जे शहरात एका स्टार्टअपकडून डिझाइन करण्यात आलेल्या एका विशेष यंत्रात सिगारेटचे हे तुकडे जमा करतात. स्टार्टअप कंपनी कॉर्विड क्लीनिंगचे संस्थापक क्रिश्चियन गुंथर-हॅनसेन यांना कावळय़ांना कामात सामील केल्याने शहराच्या सफाईचा खर्च मोठय़ा प्रमाणात कमी करता येणार असल्याचा विश्वास आहे.
स्वीडनच्या रस्त्यांवर दरवर्षी 100 कोटींहून अधिक सिगारेटचे तुकडे फेकले जातात. तेथे फैलावणाऱया एकूण कचऱयाच्या तुलनेत हे प्रमाण 62 टक्के आहे. सोडरताल्जेच्या रस्त्यांच्या सफाईवर 20 दशलक्ष स्वीडिशन क्रोनर इतका खर्च येतो. स्टार्टअपच्या पद्धतीने शहरात सिगारेटची थोटकं जमविल्यास होणाऱया खर्चात किमान 75 टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते असा गुंथर-हॅनसेन यांचा अनुमान आहे.
सोडरताल्जे पूर्ण शहरात कावळय़ांना कामात सामील करण्यापूर्वी एक प्रायोगिक प्रकल्प राबविला जात आहे. यात पक्ष्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव न टाकणाऱया कचऱयाच्या सफाईला सामील करण्यावर विचार केला जातोय. पक्ष्यांच्या कोर्विड परिवारचे सदस्य न्यू कॅलेडोनियन कावळय़ांची तर्कक्षमता एका 7 वर्षीय मुलाइतकी असल्याचे संशोधन आणि अध्ययनांमधून समोर आले आहे. हे कावळे प्रशिक्षणानंतर कचरा जमा करण्यासाठी सर्वात चतूर पक्षी ठरतात. या कावळय़ांना शिकविणे सोपे असते आणि ते परस्परांकडून शिकण्याची शक्यता देखील आहे. तसेच चुकून कचरा खाण्याची जोखीमही कमी असल्याचे गुंथर-हॅनसेन म्हणाले.
हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यास सिगारेटची थोटकं साफ करण्यासाठी येणाऱया खर्चात तीन-चतुर्थांश घट होऊ शकते असे मानले जात आहे. ही पद्धत अन्य ठिकाणीही उपयुक्त ठरू शकते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.