केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिग्नेचर संघाने युवराजचा 6 धावांनी तर रॉजर स्पोर्टस् संघाने बेळगाव स्पोर्टस् सी संघाचा 59 धावांनी, विलास बेंद्रे संघाने 5 गडय़ांनी पराभव करून 4 गुण मिळविले. आनंद मेणसे व बसवराज एच., रामनाथ काळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात रॉजर स्पोर्टस् क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या. त्यात आनंद मेणसेने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 54, अभिषेक पाटीलने 49, संतोष कारेकरने 29, श्रीकांत पाटीलने आणि रूचेने 15 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस्तर्फे वेदांत पाटीलने 3, हर्ष पाटीलने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्टस् क्लब संघाचा डाव 24.3 षटकांत 120 धावांत आटोपला. त्यात तनुष्य पाटील, धुमालेने 23, समीर नाईकने 19 धावा केल्या. रॉजरतर्फे शंकर तुर्केवाडी व सुमीत बागेवाडीने प्रत्येकी 3, श्रीकांत मरूचेने 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात सिग्नेचर संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकांत 7 बाद 196 धावा केल्या. त्यात विशाल बेडकाने 51, अमरदीप पाटीलने 57, संतोष चव्हाणने 26 धावा केल्या. युवराजतर्फे दत्तप्रसाद जांभवलेकर, अजय बेनके, अनुराग पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युवराज स्पोर्टस् संघाचा डाव 29.3 षटकांत 190 धावांत आटोपला. त्यात दत्तप्रसाद जांभवलेकरने 66, श्रीशेल जाधवने 35, कल्पेश सोमशेट्टीने 23 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे रामनाथ काळेने 22 धावांत 4 गडी बाद
केले.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात तानाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 26.5 षटकांत सर्वबाद 174 धावा केल्या. त्यात स्वागत पाटीलने 64, इतियाजने 35 तर अश्पाकने 20 धावा केल्या. विलास बेंद्रेतर्फे मृत्युंजय के. व बसवराज यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विलास बेंद्रे संघाने 28.1 षटकात 5 बाद 175 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. बसवराज एच.ने 57, अरूण पाटीलने 36, संदीप पाटीलने 25 धावा केल्या. तानाजी स्पोर्टस्तर्फे संगम पाटीलने 2 गडी बाद केले.