वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान महामानव म्हणून खास ओळख प्रस्थापित करणाऱया जमैकन विश्वविक्रमवीर धावपटू युसेन बोल्टने आयपीएल स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची जर्सी परिधान करत आपल्या नेहमीच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये या संघाला यशश्री खेचून आणण्यासाठी पाठबळ दर्शवले. ट्वीटरवर त्याने आपले आरसीबी जर्सीतील छायाचित्र शेअर करत त्याने विराट कंपनीला शुभेच्छा दिल्या.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली व युसेन बोल्ट हे ग्लोबल स्पोर्ट्सवियर ब्रँड प्युमाचे ऍम्बेसिडर असून प्युमाने अलीकडेच आरसीबीशी ऑफिशियल किट पार्टनर म्हणून करार केला आहे.
‘चॅलेंजर्स, जस्ट लेटिंग यू नो, आय ऍम स्टिल द फास्टेस्ट कॅट अराऊंड’, असे ट्वीट बोल्टने येथे केले असून आरसीबी कर्णधार विराटने, त्यासाठीच तू आमच्या प्युमाच्या पथकात आहेस, असे नमूद केले तर एबी डीव्हिलियर्सने देखील, अवांतर धावा आवश्यक असतील तर त्यासाठी कोणाला कॉल द्यायचा, हे आम्ही जाणतो, अशी मिश्किल टिपणी केली. आठवडाभरापूर्वीच कोहली व डीव्हिलियर्स यांच्यातही ट्वीटरवर अशीच जुगलबंदी रंगली होती आणि त्यावेळी या उभयतात एक धावण्याची रेस घेण्याबद्दलही चर्चा झाली होती.