भाग्यनगर येथील घटना, सीए मनोज हुईलगोळ यांना पुत्रशोक
प्रतिनिधी / बेळगाव
सिटीबसखाली एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी भाग्यनगर, दुसरा क्रॉसवर हा अपघात घडला असून प्रसिध्द चार्टर्ड अकाऊंटन्ट मनोज हुईलगोळ यांचा एकुलताएक मुलगा तनय (वय 19) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास भाग्यनगर दुसऱया क्रॉसवरील राऊळ रेस्टॉरेंट नजीक ही घटना घडली आहे. दुचाकीवरुन जाणाऱया तनयला बसची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे.
तनय हा येथील जेष्ठ चार्टर्ड अकाऊंटन्ट वामनराव व वीणा हुईलगोळ यांचा नातू तर मनोज व संजीवनी हुईलगोळ यांचा मुलगा होता. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन शनिवारी रात्री उशीरा शहापूर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, उपनिरीक्षक बसवराज शिंदगार आदी अधिकाऱयांनी भेट देवून पंचनामा केला.
केए 22 एफ 1748 क्रमांकाची सिटीबस सीबीटीहून अनगोळला जात होती. सध्या स्मार्टसिटी योजनेंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भाग्यनगरमार्गे सुरू आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या तनयला सिटीबसची धडक बसली. त्यामुळे हा अपघात घडला. तनय हा येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
स्मार्टसिटीची कामे कधी संपणार?
सध्या स्मार्टसिटी योजनेंतर्गत सर्वत्र रस्ते, गटारींची कामे सुरू आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेली कामे अद्याप संपेनात. अनगोळच्या मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे म्हणून यामार्गावरील वाहतूक भाग्यनगरवरुन वळविण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांवरील कामांमुळे उपनगरांत वाहतूक कोंडी, अपघात आदी प्रकार वाढले आहेत. कामातील दिरंगाईमुळे आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.