पुजाराचे सर्वात संथ अर्धशतक, कमिन्सचे 4 बळी, ऑस्ट्रेलियाला एकूण 197 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ सिडनी
पुजाराची अतिसंथ फलंदाजी, भारतीय फलंदाजांची हाराकिरी आणि कमिन्स-हॅझलवुडचा भेदक मारा व ऑस्ट्रेलियाचे उत्तम क्षेत्ररक्षण यामुळे भारतीय संघ येथे सुरू असलेल्या तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी अडचणीत आला असून एकूण 197 धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने सामन्यावर मजबूत पकड मिळविली आहे. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 2 बाद 103 धावा जमविल्या असून लाबुशाने व स्मिथ अनुक्रमे 47 व 29 धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा जमविल्यानंतर भारताने दुसऱया दिवशीअखेर 2 बाद 95 धावा जमविल्या होत्या. पण तिसऱया दिवशी कमिन्सच्या भेदक माऱयासमोर भारताचा डाव 244 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. भारतीय डावात पुजाराने कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक नोंदवताना 176 चेंडू घेतले. त्याच्या अतिसावध खेळामुळे जोडीदारांवर धावांची गती वाढविण्याचे दडपण येत राहिले आणि त्या प्रयत्नात ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिले. 100.4 षटकांत भारताचा पहिला डाव 244 धावांत आटोपला. खेळपट्टीकडून पुरेशी साथ मिळत नसतानाही कमिन्सने भेदक मारा करीत 29 धावांत 4 बळी मिळविले. त्याने शॉर्टपिच्ड चेंडूचा सढळ व प्रभावी वापर केला. त्याला हॅझलवुड व स्टार्क यांच्याकडून पूरक साथ मिळाली. या गोलंदाजांनी लेगट्रपचा यशस्वी उपयोग केला.
पुजाराला हुक किंवा पुलचे फटके व्यवस्थित मारता येत नाहीत. त्यामुळे त्याला कट किंवा ड्राईव्ह करण्याची संधी न देता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा अधिक वापर करीत त्याला अतिसावध खेळण्यास भाग पाडले. त्याला स्ट्राईक रोटेट करणेही फारसे जमले नाही. त्यामुळे रहाणे (70 चेंडूत 22) व पंत (67 चेंडूत 36) यांना धावांची गती वाढविण्याचा प्रयत्न करणे भाग पडले. रहाणेने लियॉनला एक षटकारही ठोकला. पण नंतर कमिन्सच्या एका ऑफकटरवर त्याने चेंडू यष्टीवर ओढवून घेतला. पुजारा-रहाणे यांनी 22.3 षटकांत केवळ 32 धावांची भर घातली. पुजाराच्या अतिसावध खेळाच्या परिणामामुळे तीन फलंदाजांना धावचीतही व्हावे लागले. त्यात हनुमा विहारीचा (38 चेंडूत 4) समावेश आहे. पुजाराला पहिल्या 100 चेंडूत एकही चौकार मारता आला नाही. कमिन्सच्या एका अप्रतिम चेंडूवर तो बाद झाला. पहिल्या सत्रात भारताने 34 षटकांत 84 धावा जमविल्या. जडेजानेही (28) नंतर फटकेबाजी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मिळणारी आघाडी शंभरच्या खाली आली. पंतने प्रारंभापासून धावगती वाढविण्यास सुरुवात केली. पण तो बाद झाल्यानंतर भारताची स्थिती 4 बाद 195 वरून लवकरच 8 बाद 210 अशी झाली. जडेजाने थोडीफार फटकेबाजी करीत संघाला अडीचशेच्या जवळपास मजल मारून दिली. त्याने 28 धावा जमविताना 37 चेंडूत 5 चौकार मारले. सिराजला बाद करून कमिन्सने भारताचा डाव संपुष्टात आणला.
अश्विनचा विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात वॉर्नर व पुकोवस्की लवकर बाद झाल्यानंतर संथ खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी, याचा वस्तुपाठच लाबुशाने व स्मिथ यांनी दिला. विशेषतः लाबुशानेने सकारात्मक खेळ करीत 67 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार मारले. आर.अश्विनने पुन्हा एकदा वॉर्नरला स्वस्तात बाद केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दहावेळा बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर डावखुऱया फलंदाजांना सर्वाधिक वेळा बाद करण्याचा आगळा विक्रम नोंदला गेला आहे.. त्याने 193 फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला आहे तर मुरलीधनने 191, इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 184, शेन वॉर्नने 172, ग्लेन मॅकग्राने 172 वेळा डावखुऱयांना बाद केले आहे. सिराजने पुकोवस्कीला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर लाबुशाने व स्मिथ यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 68 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 338, भारत प.डाव 100.4 षटकांत सर्व बाद 244 : रोहित शर्मा 26, शुभमन गिल 50, पुजारा 50 (176 चेंडूत 5 चौकार), रहाणे 22 (70 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), विहारी 4, पंत 36 (67 चेंडूत 4 चौकार), जडेजा नाबाद 28 (37 चेंडूत 5 चौकार), आर.अश्विन 10 (15 चेंडूत 2 चौकार), सैनी 3, बुमराह 0, सिराज 6 (10 चेंडूत 1 चौकार), अवांतर 9. गोलंदाजी : कमिन्स 4-29, हॅझलवुड 2-43, स्टार्क 1-61, लियॉन 0-87. ऑस्ट्रेलिया दु.डाव 29 षटकांत 2 बाद 103 : वॉर्नर 13 (29 चेंडूत 1 चौकार), पुकोवस्की 10 (16 चेंडूत 2 चौकार), लाबुशाने खेळत आहे 47 (69 चेंडूत 6 चौकार), स्मिथ खेळत आहे 29 (63 चेंडूत 3 चौकार), अवांतर 4. गोलंदाजी : सिराज 1-20, अश्विन 1-28, बुमराह 0-26, सैनी 0-28.
जडेजा चौथ्या कसोटीतून बाहेर, पंतही जखमी
अष्टपैलू रवींद्र जडेजा व यष्टिरक्षक ऋषभ पंत जखमी झाल्याने भारताच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. फलंदाजी करताना स्टार्कचा उसळता चेंडू लागून जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला प्रॅक्चर झाले आहे तर पंतच्या हाताच्या कोपराला मार बसला आहे. जडेजाला प्रॅक्चर झाले असल्याने त्याला फलंदाजीवेळी ग्लव्ह्ज घालणे आणि चेंडूवर ग्रिप करणे कठीण जाणार असल्याने तो गोलंदाजीही करू शकणार नाही. पहिल्या डावात त्याने 4 बळी मिळविले होते.
पुलचा फटका मारताना पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला झालेली दुखापत फार गंभीर नसल्याने तो दुसऱया डावात फलंदाजी करू शकणार आहे. कमिन्सचा उसळता चेंडू लागून तो जखमी झाला होता. वेदना झाल्याने त्याच्यावर मैदानातच प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्याने फलंदाजीही केली. पण यावेळी त्याच्या हाताच्या हालचालीवर मर्यादा आल्यामुळे हॅझलवुडच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. आयसीसीने नियमावलीत बदल केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात पंतच्या जागी वृद्धिमान साहा यष्टिरक्षण करीत आहे. सिडनी कसोटी खेळेपर्यंत भारताने दुखापतीमुळे अनेक खेळाडू गमविले आहेत. त्यात इशांत शर्मा (मालिकेआधी), शमी, उमेश यादव, केएल राहुल यांचा समावेश आहे तर विराट कोहली पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी परतला आहे.
भारताच्या बुमराह, सिराजवर प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजी, भारताची तक्रार
जलद गोलंदाज बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यावर ते क्षेत्ररक्षण करीत असताना सिडनी मैदानावर असलेल्या प्रेक्षकांमधील एका गटाने वारंवार वर्णद्वेषी टिपणी केल्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाने सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. सदर प्रेक्षकांनी मद्यप्राशन केले असल्याचे समजते. कर्णधार रहाणेने मैदानी पंचांकडे याबद्दल प्रथम तक्रार केली. नंतर साहायक स्टाफमधील सदस्यांनी बुमराह व सिराज असलेल्या ठिकाणी मागे उभे राहत त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर संघव्यवस्थापनाने बून यांची भेट घेत त्यांच्याकडेही तक्रार नेंदवली. या कसोटीत दररोज 10,000 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे मोजक्या लोकांनी केलेली शेरेबाजी सर्वांना स्पष्टपणे ऐकू येत होती. सुरक्षा रक्षक आणि आयसीसीचे पदाधिकारी यांचेही याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.