वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियामध्ये शनिवारी झालेल्या महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सिडनी थंडर संघाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सिडनी थंडरने मेलबोर्न स्टार्सचा 7 गडय़ांनी पराभव केला.
सिडनी थंडर संघाने महिलांच्या बिग बॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेचे दुसऱयांदा अजिंक्यपद मिळविले आहे. 2015-16 च्या कालावधीत पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत सिडनी थंडरने विजेतेपद पटकाविले होते. या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेलबोर्न स्टार्सने 20 षटकांत 9 बाद 86 धावा जमविल्या. त्यानंतर सिडनी थंडरने 13.4 षटकांत 3 बाद 87 धावा जमवित स्पर्धेचे विजेतेपद हस्तगत केले. महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ही मेलबोर्न स्टार्सची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. मेलबोर्न स्टार्सच्या डावामध्ये इंग्लंडच्या ब्रुटने नाबाद 22 धावा जमविल्या. सिडनी थंडरतर्फे सहा गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सिडनी थंडरच्या जॉन्सनने दोन बळी मिळविले. त्यानंतर सिडनी थंडरच्या डावामध्ये कर्णधार रॅचेल हेन्सने नाबाद 21, नाईटने नाबाद 26 धावा जमविल्या. नाईटने विजयी षटकार ठोकून सिडनी थंडरला विजय मिळवून दिला.