वृत्तसंस्था/ सिडनी
वेस्ट इंडीजचा कसोटी कर्णधार जेसॉन होल्डरला आगामी बिग बॅश टी-20 लीगमधील तीन सामन्यांसाठी करारबद्ध केले असल्याचे मंगळवारी सिडनी सिक्सर्सने जाहीर केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी होल्डर सध्या न्यूझीलंडमध्ये तयारी करीत असून या महिन्याच्या अखेरीस तो होबार्टमध्ये सिक्सर्स संघात दाखल होणार आहे. 29 वर्षीय अष्टपैलू होल्डर 20 डिसेंबर रोजी होबार्टमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध होणाऱया लढतीत सिक्सर्सतर्फे खेळण्यास उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी सिक्सर्सची लढत मेलबर्न स्टार्सविरुद्ध आणि 29 डिसेंबर रोजी मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध लढत होणार आहे. होल्डर पहिल्यांदाच बिग बॅशमध्ये सिक्सर्सतर्फे खेळणार असून सिक्सर्स संघाचा कर्णधार मोईजेस हेन्रिक्ससमवेत तो 2014 व 2015 च्या आयपीएलमध्ये सनराजर्स हैदराबाद संघातून खेळला आहे.