प्रतिनिधी /म्हापसा
सिद्धी नाईक आत्महत्या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी बुधवारी पुन्हा एकदा सिद्धीचे वडील संदीप याला बोलावून त्यांची जबानी नोंद करून घेतली त्याचबरोबर सिद्धीचे दोन चुलत बंधू तसेच नावेली सांखळी येथील प्रियकर व त्याच्या मित्राचीही जबानी नोंद करून घेतल्याची माहिती निरीक्षक नालास्को रापोझ यांनी या प्रतिनिधीला दिली. पोलिसांनी आपली चौकशी योग्य ट्रेकवर ठेवली असून सिद्धी समुद्र किनाऱयावर कशी पोचली, सिद्धीचे कपडे कसे गायब झाले व सिद्धी त्या सकाळी चार तास कुठे होती याची माहिती पोलीस करून घेत असून पालक या कामी सहकार्य करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सिद्धीचा प्रियकर व त्याच्या मित्राची जबानी पोलिसांनी घेतली आहे. सिद्धीचे घरात वागणे कसे होते याबाबतही अधिक माहिती पोलिसांनी सिद्धीच्या चुलत बंधूकडून जाणून घेतली आहे. उद्याही ही चौकशी सुरूच राहील अशी माहिती पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिली.
दरम्यान कळंगूट पोलिसांनी बस चालकास पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याकडून पुन्हा चौकशी केली आहे. मयताचे वडील संदीप आपली जबानी पुन्हा पुन्हा बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठा पेच प्रसंग आला आहे. विशेष म्हणजे सिद्धीचा मृत्यू झाला त्यापूर्व रात्री सिद्धी व त्याची बहीण सुमारे एक तास प्रियकराशी बरोबरीने बोलले होते अशी माहिती नव्याने चौकशीअंती उघडीस आले होते. यापूर्वी पोलीस चौकशीत सिद्धीच्या प्रियकराने वडील संदीप नाईक यांच्याशी फोनवरून बोलून सिद्धीच्या बहिणीच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते त्यामुळे सिद्धी तणावाखाली होती. व त्यातूनच सिद्धीने वैफल्यग्रस्त होऊन तणावाखाली आत्महत्या केली असावी असा दावा पोलिसांनी केला होता. त्यादृष्टीने पोलीस चौकशी सुरू आहे.