10 मुद्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ मोहाली
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंजाब मॉडेल सादर केले आहे. राज्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी हा रोडमॅप आणि व्हिजन असल्याचे म्हणत केजरीवालांनी यात 10 मुद्दे सामील केले गेल्याचे सांगितले.
मोहालीत पोहोचलेल्या केजरीवालांनी शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चाशी आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेतकरी नेते बलवीर राजेवाल यांनी 60 जागा मागितल्या होत्या. परंतु त्यापूर्वीच आपने 90 उमेदवार निश्चित केले होते. राजेवाल यांना 10-15 जागा देण्याची तयारी दर्शविली होती, परंतु त्यांनी नकार दिल्याचे केजरीवाल म्हणाले.
आम आदमी पक्षाचे पंजाब मॉडेल
रोजगार ः पंजाबमध्येरोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करू, जेणेकरून कॅनडात गेलेले लोक देखील पंजाबमध्ये परततील. दिल्लीत 10 लाख जणांना रोजगार दिला.
अमली पदार्थ ः गावांमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री होतेय. काँग्रेस सरकार काळातही अमली पदार्थांचा सुळसुळाट थांबलेला नाही. माफियांना संपवू.
कायदा-सुव्यवस्था ः अवमानाच्या अनेक घटना घडल्या, परंतु एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. पोलिसांना मुक्तहस्त देण्यात आलेला नाही. सर्व प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा मिळवून देऊ. राज्यात शांतता-बंधूभाव निर्माण करू.
भ्रष्टाचारमुक्त शासन ः नैसर्गिक स्रोतासह पंजाबमध्ये कराद्वारेही चांगली कमाई होते. परंतु आता सर्व रक्कम नेत्यांच्या खिश्यात जातेय, राज्यातील भ्रष्टाचार संपवू.
शिक्षण ः पंजाबमधील शासकीय शाळांची स्थिती बिकट आहे. शिक्षक मुलांना शिकविण्याऐवजी रस्त्यांवर संघर्ष करत आहेत. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार.
आरोग्य ः दिल्लीप्रमाणेच 16 हजार मोहल्ला क्लीनिक, उत्तम शासकीय रुग्णालय आणि पंजाबच्या 3 कोटी लोकांच्या प्रत्येक आजारावर मोफत उपचार.
वीज ः पंजाबमध्ये ऊर्जानिर्मिती होते, तरीही भारनियमन केले जाते. राज्यात मोफत आणि 24 तास वीज पुरवठा करणार.
महिलांना एक हजार रुपये ः 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 1 हजार रुपये जमा करणार.
शेती व्यवस्था ः शेतकऱयांच्या राज्य सरकारशी निगडित प्रत्येक मुद्याचे निराकरण करणार. केंद्राशी संबंधित मुद्दय़ांवर संघर्ष करू.
व्यापार अन् उद्योग ः लालफितशाही बंद करणार, व्यापार आणि उद्योग वाढला तरच रोजगार वाढणार आहेत.