पतियाळात शेतकऱयांचे आंदोलनाला कॅप्टनचा विरोध- सिद्धूंचा पाठिंबा
वृत्तसंस्था/ पतियाळा
पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना उघड आव्हान दिले आहे. सिद्धू यांनी मंगळवारी अमृतसर तसेच पतियाळा येथील स्वतःच्या निवासस्थानी काळा झेंडा फडकविला आहे. सिद्धू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना काळे झेंडे लावण्याचे आवाहन केले आहे.
तत्पूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय किसान युनियनला 28 मे पासून पतियाळात होणारे तीन दिवसीय धरणे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. या आंदोलनामुळे पंजाबमध्ये संक्रमण वेगाने फैलावू शकते असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेच्या विरोधात जात सिद्धू यांनी काळा झेंडा फडकवून त्यांना आव्हान दिले आहे.
काळे कायदे रद्द केले जात नाही किंवा राज्य सरकार पिकांची खरेदी तसेच हमीभावाला विश्वासार्ह ठरविण्याचा पर्याय देत नाही तोवर लोकांनी स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावावेत असे सिद्धू यांनी म्हटले आहे.
26 मे रोजी शेतकऱयांच्या आंदोलनाला 6 महिने पूर्ण होणार आहेत. तिन्ही कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्यातील चर्चा 4 महिन्यांपासून बंद आहे. याचमुळे शेतकरी संघटनांनी 26 रोजी काळा दिन पाळण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील 32 शेतकरी संघटना यात सामील होणार आहेत.
सिद्धू अन् कॅप्टन यांच्यात संघर्ष
दोन वर्षांपूर्वी मंत्रिपदाचा राजनामा देणारे नवज्योत सिंग सिद्धू सातत्याने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना लक्ष्य करत आहेत. सिद्धू पूर्वी भाजपमध्ये होते. काँग्रेस नेतृत्वाने अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात समेट घडवून आणण्याचा दोनवेळा प्रयत्न केला, पण अपयश आले आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद हवे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, पण मुख्यमंत्र्यांची हे पद देण्याची तयारी नसल्याचे समजते. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.