बेडकिहाळ ग्रामस्थांकडून सामाजिक अंतराचे पालन : मानकऱयांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा
वार्ताहर/ बेडकिहाळ
सिद्धेश्वर महाराज की जय, हर हरच्या जयघोषात, सनई चौघडा, करंडोलच्या गजरात सुक्षेत्र बेडकिहाळ नगरीचे ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर पालखी सोहळा, पालखी मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत मंगळवार 27 रोजी भक्तीमय वातावरणात झाला.
दुपारी 2 वाजता सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार आर. वाय. बिळगी यांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखी मिरवणुकीस सुरूवात करण्यात आली. यावेळी दसरा कमिटी, मंदिर कमिटी, पालखी कमिटी व ग्रामपंचायतीकडून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पालखीच्या दोन्ही बाजूला दोरी लावून सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते. तर पालखी मानकरी व ग्रामस्थांनी मास्कचा वापर करीत उपस्थिती लावली.
मंदिरातून पालखी जुना बस स्थानक, नदीवेसमार्गे दूधगंगा नदीकडे रवाना झाली. नदीवरील कट्टय़ावर विठ्ठल बिरदेव व सिद्धेश्वर पालखीचे आगमन होताच नैवद्य दाखवून पालखी पूजन करण्यात आले. यावेळी पालखी मानकऱयांकडून सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाला. पालखी मिरवणूक बेडकिहाळ-बोरगाव मार्गावरून बेडकिहाळ सर्कल येथील कट्टा, कुस्ती मैदान कट्टामार्गे डवरी कट्टय़ावर विराजमान होताच डवरी समाजाकडून पूजा व आरती करण्यात येते.
यानंतर रात्री 8 वाजता पालखी मिरवणूक रेणुका मंदिरजवळ तेथून दसरा चौकातील विजयराव इनामदार यांच्या वाडय़ात आली. रात्री 10 वाजता श्रांची पूजा-अर्चा विजयराव इनामदार सरकार व बाळासाहेब इनामदार यांच्या परिवाराकडून करण्यात आली. रात्री 12 वा. लहान वाडय़ात इनामदार, कुलकर्णींकडून पालखी पूजन, महाआरती करण्यात आली. सामाजिक अंतर ठेवून पुन्हा पालखी मिरवणूक पंत मंदिर परिसरात आली. नंतर पहाटे 5 वाजता तुळजा कट्टय़ावर पालखीचे आगमन झाले. यानंतर गावचावडीमार्गे श्रींची पालखी मंदिरात आली. यावेळी पालखी प्रदक्षिणा घालून मानकऱयांना श्रीफळ, साखर वाटप करत दसरा पालखी सोहळय़ाची सांगता करण्यात आली.