वैद्यकीय पथकाकडून उपचार : अनेक स्वामीजी, मठाधिपती, राजकीय नेत्यांची ज्ञान योगाश्रमाला भेट
प्रतिनिधी/ बेंगळूर
‘चालते देव’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध प्रवचनकार विजापूर येथील ज्ञान योगाश्रमाच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रकृती चिंताजनक असून विशेष वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्वर स्वामीजी आजारी होते. असे असले तरी स्वामीजींच्या आश्रमात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आजारी असतानाही स्वामीजींनी भाविकांना दर्शन देणे सोडलेले नाही. शारीरिक थकवा असूनही सिद्धेश्वर स्वामीजी भाविकांना नियमित दर्शन देत होते.
सिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. मल्लण्णा मुलीम यांनी सांगितले. सकाळपासून प्रकृती सामान्य आहे. पल्स, बीपी, श्वसन सामान्य आहेत. स्वामीजींनी गंजी सेवन केली आहे. शनिवारी स्वामीजींची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते जेवलेले नसल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. स्वामीजींची प्रकृती खालावल्याने जिल्हाधिकारी विजय महांतेश, जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी एच. डी. आनंदकुमार यांनी आश्रम परिसरात तळ ठोकला आहे. म्हैसूर येथील सुत्तूर मठाचे शिवरात्री देशी केंद्र स्वामीजींसह अनेक विविध मठाधिपती आश्रमात आले आहेत.
पंतप्रधानांकडून प्रकृतीची विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धेश्वर स्वामीजींच्या आजाराबाबत चिंता व्यक्त केली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. आपल्या सर्वांसाठी आदर्श असलेले श्री सिद्धेश्वर स्वामीजी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी रात्री उशिरा बेंगळूरहून विजापूरला रवाना होऊन सिद्धेश्वर स्वामीजींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या भेटीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या आठवडाभरापासून मी स्वामीजींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहे. 2 दिवसांपूर्वी स्वामीजी फोनवर बोलले होते. त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होऊन ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवते केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी होते.