तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांचे प्रतिक म्हणून त्यांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा करण्यात आली. हा विधी थोबडे आणि हिरेहब्बू परिवारातील धार्मिक विधी आहे. शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांचे वारसदार म्हणून थोबडे यांच्या वाडय़ात होमहवन व हिरेहब्बू यांचे पाद्य पूजनाने यात्रेच्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला.
थोबडे वाडय़ात शनिवारी दुपारी ऍड. रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाची पूजा करण्यात आली. प्रारंभी योगदंड आणण्याचे मानकरी शिवशंकर कंठीकर यांनी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड आणि हिरेहब्बू यांना थोबडे वाडय़ात घेऊन आले. सोन्याच्या या योगदंडास चौरंगी पाटावर ठेऊन संबळाच्या निनादात विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन करण्यात आले. ऍड. मिलिंद थोबडे त्यांचे चिरंजीव ऍड. रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली.
सिध्दरामेश्वरांचे केळवण
अक्षता सोहळ्याच्या विधीनुसार नववधू-वरांना पाहुण्यांची घरी जेवण्यासाठी बोलाविले जाते. कुंभार कन्येचा विवाह हा श्री सिध्दरामेश्वरांच्या योगदंडाशी झाला होता. त्यामुळे श्री सिध्दरामेश्वरांच्या प्रतिकात्मक योगदंडास केळवणासाठी शेटे यांच्या वाडय़ात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
थोबडे कुटुंबीयांकडे 33 वर्षांपासून मान
कै. रामचंद्र शेटे यांचे वारसदार म्हणून ऍड. मिलिंद थोबडे यांच्याकडे 1987 पासून म्हणजेच 33 वर्षांपासून या विधीचा मान आला. त्यापूर्वी शेटे परिवाराकडून श्री सिध्दरामेश्वरांची सेवा सुरू होती. ऍड. मिलिंद थोबडे यांच्या योगदंडाची पूजा करण्याला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मागील आठ वर्षांपासून ही सेवेची धुरा मुलगा ऍड. रितेश थोबडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.