सावळज / वार्ताहर
सावळज परीसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने अग्रणी नदीला आलेल्या महापुरामुळे मानवा बरोबर प्राण्यांचे ही हाल सुरू आहे. सिध्देवाडी तलाव परीसरात पुराच्या पाण्यात माकड गेली दोन दिवसापासून माकड अडकले आहे. या पिल्लाला वाचविण्यासाठी व त्याला खाऊ देण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. या पुराच्या संकटांत अडकलेल्या माकडासाठी माणुसकीची धडपड दिसून आली.
पुराच्या पाण्याचा फटका सावळज परीसरातील नागरिकांसह प्राणीमात्रांनाही बसला आहे. सिध्देवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सिध्देवाडी तलावामधुन धबधबा परीसरात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण अचानक वाढलेल्या या पाण्यामुळे तलाव धबधबा परीसरातील झुडपात माकड अडकले आहे. या झुडपाच्या चहुबाजुने पाण्याचा जोरदार प्रवाहाचा वेडा पडल्याने या माकडाला बाहेर येता येईना. मात्र गेली दोन दिवस या झुडपाच्या परीसरात आणखी एक माकड वारंवार येवुन इकडेतिकडे फिरत उड्या मारत आहेत. ही माकडाची धडपड काही नागरिकांच्या लक्षात आली. आणि ही एका माकडाची दुसर्या माकडाला वाचविण्यासाठी प्रेमाची धडपड असल्याचे दिसून आले.
पण या वाढत्या पुराचे पाण्याने माकडाची धडपड व्यर्थ ठरू लागली. या माकडाला वाचविण्यासाठी दुसर्या माकडाची केविलवाणी धडपड पाहून येथील नागरिकांच्या मनात ही प्राणीदयेचा झरा वाहु लागला. आणि सिध्देवाडी सरपंच पंचाक्षर संगम यानी काही सहकार्याच्या मदतीने दोन दिवसापासून अडकलेल्या माकडासाठी प्रयत्न करू लागले.
पुरात अडकलेल्या माकडासाठी फिरण्यासाठी मोठी जागा आहे. त्यामुळे पाण्यात वाहुन जाण्याचा धोका नाही पण भुकेने व्याकुळ झालेल्या माकडाला प्रथम खाऊ देण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात मानवी साखळी करून खायला ठेवले. व माकडाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण जोरदार प्रवाहामुळे नागरिकांचे प्रयत्न टोकडे पडु लागले. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
वन्यजीव बचाव विभागाने प्रयत्न करण्याची गरज
सिध्देवाडी नागरिक या पुराच्या पाण्यात अडकलेल्या माकडासाठी वाचविण्याचे प्रयत्न करीत असुन या माकडाला वाचविण्यासाठी वन्यजीव बचाव विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. माकडाला वाचविण्यासाठी चाललेल्या माणुसकी च्या धडपडीला यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.