वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रोम खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीचा जेनिक सिनेर आणि रशियाचा कारात्सेव्ह यांनी विजयी सलामी दिली. दरम्यान रशियाच्या 16 व्या मानांकित डिमिट्रोव्हचे आव्हान पहिल्याच फेरीत स्पेनच्या फोकिनाने संपुष्टात आणले. या स्पर्धेत इटलीच्या सिनेरचा दुसऱया फेरीतील सामना स्पेनच्या नदाल बरोबर होणार आहे.
सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात इटलीच्या सिनेरने फ्रान्सच्या हंबर्टचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. आता सिनेरचा दुसऱया फेरीतील सामना स्पेनच्या अनुभवी आणि या स्पर्धेचे आतापर्यंत नऊवेळा विजेतेपद मिळविणाऱया राफेल नदालशी होणार आहे. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात रशियाच्या कारात्सेव्हने किमेनोव्हिकचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव केला. दुसऱया फेरीत कारात्सेव्हचा सामना रशियाच्या मेदव्हेदेवशी होणार आहे. मेदव्हेदेवला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. अमेरिकेच्या फ्रिझने इव्हान्सचा 6-3, 6-2, जपानच्या निशीकोरीने इटलीच्या फॉगनेनीचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. रशियाच्या 16 व्या मानांकित डिमिट्रोव्हचा स्पेनच्या फोकिनाने 6-4, 7-6 (7-2), स्पेनच्या ऍग्यूटने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-3, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेती स्वायटेकने तसेच अमेरिकेची गॉफ, झेकची क्विटोव्हा यांनी विजयी सलामी दिली. रिसेकीला दुखापत झाल्याने तिने पहिल्या सेटमधून माघार घेतल्याने स्वायटेकने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. अमेरिकेच्या गॉफने रशियाच्या पुतिनसेव्हाचा 7-5, 4-6, 6-4, झेकच्या क्विटोव्हाने पोलंडच्या लिनेटीचा 1-6, 6-0, 6-2, अर्जेंटिनाच्या पोडोरोस्काने जर्मनीच्या सिंगमंडचा 2-6, 7-6 (7-3), 6-1, अमेरिकेच्या मॅडिसन किजने आपल्याच देशाच्या स्टीफेन्सचा 4-6, 6-2, 7-5 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.