वृत्तसंस्था / चेन्नई
शहरात गृहबांधणी उद्योगात होणारी वाढ आणि पायाभूत सुविधांच्या कार्यामुळे येणाऱया काळात सिमेंटच्या मागणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील आर्थिक वर्षात सिमेंट विक्रीत 13 टक्के इतकी वाढ होणार असल्याचे मत क्रिसील या रिसर्च संस्थेने व्यक्त केले आहे.
सिमेंटची मागणी पुढच्या आर्थिक वर्षात 10 वर्षामागचा विक्रम मोडीत काढेल असा अंदाज आहे. पायाभूत सुविधांमध्ये होणारी वाढ यासाठी कारणीभूत ठरणार असून सोबत गृहबांधणी उद्योगही हळुहळू वेग पकडू लागला असल्याने या उद्योगांकडून सिमेंटची मागणी येत्या काळात वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आल्याने रस्ते विकासासह इतर पायाभूत सुविधांच्या कार्याला येणाऱया काळात वेग येताना दिसणार आहे. यातूनच सिमेंटची मागणी वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आर्थिक वर्षात सिमेंटवरच्या भांडवली खर्चात घट झाली आहे. मध्यंतरी विविध क्षेत्रातील व्यवसाय बंद असल्याने सिमेंटच्या मागणीत दबाव दिसला. विविध उद्योग, व्यवसायासह बांधकाम क्षेत्रातल्या हालचाली वाढल्याने येत्या काळात सिमेंटची मागणी सर्वोच्च स्तरावर पोहचू शकते.