वृत्तसंस्था/ बेंगळूर
ऑस्ट्रेलियाचे ख्रिस सिरिएलो यांनी भारतीय हॉकी संघाचा विश्लेशण प्रशिक्षकपदाचा त्याग करत गेल्या काही दिवसापासून हॉकी इंडियामध्ये चालू असलेल्या वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडला आहे. सिरिएलो यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय हॉकी क्षेत्रातील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे 34 वर्षीय सिरिएलो हे ऑस्ट्रेलियाच्या हॉकी क्षेत्रातील दर्जेदार आणि अव्वल हॉकीपटू म्हणून ओळखले जातात. 2018 च्या जानेवारीमध्ये सिरिएलो यांचे भारतीय हॉकी संघाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतात आगमन झाले होते. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने त्यांची विश्लेषण प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीत ते भारतीय हॉकी संघाचे विश्लेषक मार्गदर्शक होते. आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय संघांचे साहाय्यक प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक ही पदे भूषविली. भारतीय हॉकी संघातील पेनल्टी कॉर्नर तज्ञ खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. हॉकी क्षेत्रातील सिरिएलो यांना मोठा अनुभव असल्याचे मत अनेक भारतीय हॉकीपटूंनी व्यक्त केला आहे.
कोरोना महामारी समस्येनंतर सिरिएलो हे गेल्या जूनमध्ये ऑस्ट्रेलियाला परत गेले होते. दरम्यान भारतीय हॉकी संघातील संभाव्य हॉकीपटूंसाठी चार आठवडय़ाकरिता आयोजलेले सराव शिबीर खंडीत करण्यात आले. बेंगळूरच्या साई पेंद्रामध्ये भारतीय संघातील हॉकीपटू 4 ऑगस्ट रोजी एकत्रित आले होते पण सिरिएलो यांचे वास्तव्य ऑस्ट्रेलियात होते. व्हिसा समस्येमुळे ते भारतात येवू शकले नाहीत, असे हॉकी इंडियातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना चर्मरोगाचा त्रास होवू लागल्याने त्यांचे भारतातील आगमन उशीरा होणार असल्याचे हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले हेते. गेल्या काही दिवसांच्या कालावधीत हॉकी इंडियातर्फे भारतीय हॉकी संघासाठी नियुक्त केलेल्या विविध पदावरील ऑस्ट्रेलियाच्या तीन व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन तसेच त्यानंतर भारतीय हॉकी संघाचे फिजीओ डेव्हिड मॅकडोनाल्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून ते मायदेशी परतले. भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक होत असल्याने सिरिएलो यांनी मायदेशी जाण्याचा निर्णय निश्चित केला. पुढीलवर्षी होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी आता हॉकी इंडियाला आता नव्या विश्लेषक प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे.