म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : घरगुती सिलिंडर गॅसचे दर वाढविण्यात आले आहेत. याचबरोबर शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी म. ए. युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सिलिंडर गॅसचे दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गोर-गरीब जनतेला मोठा फटका बसला आहे. नुकतेच 50 रुपये दर वाढविला आहेत. तर व्यावसायिक सिलिंडरला 350 रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. घरगुती गॅस वाढविल्यामुळे जनतेचे बजेट कोलमडणार आहे. याचबरोबर व्यावसायिक गॅसचा दर वाढविल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थी, नोकरदार यांच्यावर होणार आहे. तेव्हा त्याचे दर तातडीने कमी करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने देण्यात आले आहे.
शहरामध्ये गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तेव्हा महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. 24 फेब्रुवारी रोजी आचार्य गल्ली, शहापूर येथील रिद्धी कपिल माळवी या चार वर्षीय बालिकेवर आणि झटपट कॉलनी, अनगोळ येथील शिवराज मौर्य या पाच वर्षांच्या बालकावर कुत्र्यांनी हल्ला केला. तर ऋतिक चौगुले (गोंधळी गल्ली) या मुलावरही कुत्र्याने हल्ला केला आहे. य् ााचबरोबर शहरामध्ये इतर ठिकाणीदेखील कुत्र्यांनी अनेकांवर हल्ले केले आहेत. वडगाव येथे तर एका व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. जवळपास 10 हून अधिक घटना घडल्या आहेत. तेव्हा तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, सूरज कुडुचकर, विनायक कावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.